मुंबई : राज ठाकरे यांनी ठाण्यातील भाषणात भाजपबद्दल अवाक्षरही काढले नाही. कदाचित भाजपने त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवली असावी किंवा त्यांचे भाजपशी काही साटेलोटे असावेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज यांना प्रत्युत्तर दिले. 

ठाण्यातील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर खरपूस टीका केली होती. त्यास पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. सद्यस्थितीत महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील मुख्य प्रश्न आहेत. इंधन व घरगुती वापराच्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असताना ठाकरे यांच्या भाषणात महागाईबद्दल अवाक्षरही नव्हते. यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. वाढत्या महागाईबद्दल एखादा राजकीय नेता आपल्या सभेत काहीच बोलत नसल्यास त्याचा काय अर्थ काढायचा, असा सवालही पवार यांनी केला.

  ‘‘आमचा पक्ष संपणारा नसून, संपविणारा आहे’’, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘बरोबर आह़े संपविणारा पक्ष आहे, याची नोंद राज्यातील मतदारांनी घेतली (पान ४ वर) (पान १ वरून) आणि मनसेचा एकच आमदार निवडून दिला़’’ शिवराळ भाषा आणि नकला पाहण्यासाठी लोक जमतात. यांच्या सभांमुळे लोकांची करमणूक होते, असा टोलाही पवार यांनी लगावला. ‘‘मी शाहू, फुले व आंबेडकर यांचीच नावे घेतो, शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, असा उल्लेख राज यांनी भाषणात केला होता. दोन दिवसांपूर्वीच अमरावतीच्या कार्यक्रमात मी शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल २५ मिनिटे बोललो. अर्थात, त्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्रे वाचावी लागतात’’, असा टोलाही पवार यांनी राज यांना लगावला. शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी रचले होते. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले. सामाजिक ऐक्य कायम राखण्याचे मोठे काम या तीन महापुरूषांनी केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळय़ा दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असे पुरंदरे यांनी लिहून ठेवले होते. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल  जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे, असेही पवार म्हणाले. 

‘‘सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारणार नाही, असे जाहीर केल्यानेच काँग्रेसबरोबर गेलो. त्या काळात जे काही घडले त्याचे वाचन केले असते तर राज ठाकरे असे बोलले नसते, असा चिमटाही पवार यांनी काढला. अजित पवार यांच्यावर छापे पडतात आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई होत नाही, हा पोरकट उल्लेख होता, असे पवार यांनी सुनावले. मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करेल, असे पवार यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी विक्रांतच्या नावे निधी गोळा केला असेल तर तो पक्षाकडे देण्याऐवजी सैन्यदल किंवा माजी सैनिक कल्याण निधीत देणे आवश्यक होते, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

प्रबोधनकारांचा आदर्श

‘‘मी नास्तिक असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. पण, मी तुमच्यासारखे देव -धर्माचे प्रदर्शन करीत नाही. मी प्रत्येक निवडणुकीचा नारळ बारामतीमधील देवळात फोडतो. त्याचा कधी गाजावाजा केला नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरे यांचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव-धर्माच्या नावे बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर टीका केली होती. आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो, पण कुटुंबातील व्यक्तींनीच वाचले नसावे’’, असा  टोलाही पवार यांनी राज यांना लगावला.