मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरुन शिवसेना शिंदे व ठाकरे पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले. ‘मैत्री अशी ठेवा की इतरांचा जळफळाट होईल’ असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मारला.

हिंदुत्वासाठी जुने कार्यकर्ते एकत्र आले तर आनंदच होईल, असे मत खासदार नरेंश म्हस्के यांनी व्यक्त केले. ‘आता आमचा भाऊ पळवला’ अशी आवई उठवली जाईल अशी टीका शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी केली. शिंदे यांच्याबरोबरचे आमचे भांडण टोकाचे आहे, ते कायम राहिल असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांनी बुधवारी शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन येथे जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचे उध्दव ठाकरे यांना सहन झालेले नसेल. मैत्री अशी असावी की इतरांचा जळफळाट झाला पाहिजे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मारला.

दोन्ही नेते बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले आहेत. या भेटीने काही जणांच्या पोटात पोटशूळ उठला असेल. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे दोन कार्यकर्ते एकत्र आले तर आनंद आहे, असे म्हस्के यांनी सांगितले. पालिका निवडणुकीत महायुतीवर थेट टीका करणारे राज ठाकरे यांनी बुधवारी शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.