काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. हे प्रकरण आता शांत झालं होतं. पण पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून मोठं विधान केलं आहे. अजूनही काहीजणांची चरबी उतरली नाही, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मशिदीवरील भोंगे बंद व्हावेत, ही बाळासाहेब ठाकरेंची मनापासून इच्छा होती. ही इच्छा आपण पूर्ण केली. आपण त्यांना मशिदीवरून भोंगे काढा, असं सांगितलं नाही. मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असं सांगितलं. ह्या एका गोष्टीमुळे मशिदीवरील भोंगे उतरवले.”

“पण अजूनही काहीजणांची चरबी उतरली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना मी सांगू इच्छितो की, जिथे-जिथे असे भोंगे सुरू असतील, तिथे पहिल्यांदा पोलिसांत जाऊन तक्रार करा. पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तरीही पोलिसांनी काही कारवाई केली नाही, तर मोठ्या ट्रकमध्ये मोठे स्पीकर लावून त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावा. त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्…” असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

“जोपर्यंत आरे ला कारे होत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. त्यामुळे मला महाराष्ट्र सैनिकांकडून अपेक्षा आहे, समोरून आरे म्हटलं तर आपल्याकडून कारे म्हटलंच पाहिजे” असंही राज ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray latest speech speakers on mosque mumbai mns melava rmm
First published on: 27-11-2022 at 20:35 IST