मुंबई : निष्ठा आज सहज विकल्या जात आहेत, तत्वे फेकून दिली जात आहेत, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झाले आहे. पूर्वी गुलामांचा बाजार भरत असे, आज राजकारणात माणसांचा लिलाव सुरु आहे. हे पाहून आपण व्यथित झालो असून याची शिसारी येते, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य करताना शुक्रवारी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त शिवसेनेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, राजकारणात आज माणसांचा लिलाव सुरु आहे, हे चित्र पहायला बाळासाहेब हयात नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. आजचे राजकीय चित्र ते पाहू शकले नसते. मी काय सांगितले आणि तुम्ही हे काय केले, असे त्यांना वाटले असते. हिंदुत्वाचा बाजार पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते. या देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला बाळासाहेबांनी शिकविले. हिंदू ही राजकीय शक्ती बनू शकते, हे तेव्हा भाजपच्या गावीही नव्हते. हिंदूंना बाळासाहेबांनी स्वाभिमानाने उभे केले.
बाळासाहेब सर्व राजकीय नेत्यांपेक्षा वेगळा माणूस होता. तो जगाला कळला नाही. बाहेर अभूतपूर्व गोंधळाची स्थिती असताना ते तन्मयतेने व्यंगचित्र रेखाटत. कलाकार म्हणून त्यांची व्यंगचित्र काढताना समाधी लागते असे. बाळासाहेब कसे मांडायचे, असा मला अनेकदा प्रश्न पडतो. काका म्हणून मांडू, व्यंगचित्रकार म्हणून की शिवसेनाप्रमुख म्हणून मांडायचे. असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
बाळासाहेबांमध्ये हे सारे येते कुठून, असा प्रश्न पडायचा. बाळासाहेबांनी अनेक नेते उभे केले. पण आज जे घडत आहे, ते पाहू शकले नसते. मीही बाहेर पडलो, पण, ते पक्षातून नाही. ते घर सोडणे हाेते. त्याला आता वीस वर्षे झाली. या काळात मला अनेक गोष्टी उमगल्या, उद्धवला सुद्धा समजल्या असतील, अशी जाहीर कबुली राज यांनी यावेळी दिली .
राज यांनी दिले वचन
राजकारणात बाळासाहेबांना लवचिक भूमिका घ्यावी लागली. म्हणून त्यांचे मराठी माणसावरचे प्रेम तसूभर पण कमी झाले नाही. ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर पण कमी होणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये वचन दिले.
