राज्यात मध्यावधी निवडणुका घ्या ; राज ठाकरे यांचे आवाहन, मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ सभांचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना राज ठाकरे यांनी सूचक इशारा दिला.

Raj Thackeray MNS Padwa Melava Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील सभेला उपस्थित जनसमुदाय

मुंबई: एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला असून उद्योगही राज्याबाहेर जात आहेत. बेरोजगारी वाढत आहेत, अशा परिस्थितीत जनता सरकारकडे आशेने बघत असताना सरकार न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. न्यायालयावर अवलंबून असणारे सरकार चालविण्यापेक्षा राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या आणि राजकीय अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावा, अशी भूमिका मांडत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मशिदींवरील भोंगे महिन्याभरात हटवावेत अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा तसेच माहीम येथील समुद्रात उभे राहत असलेल्या दग्र्यावर महिनाभरात कारवाई झाली नाही तर तेथे भव्य गणपती मंदिर उभारण्याचा इशारही ठाकरे यांनी दिला.  मनसेचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी  झाला. या वेळी राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.‘आजवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटल्याचे ऐकत होतो; पण महाराष्ट्र लुटून अलिबाबा आणि ४० जण सूरतला गेल्याचे प्रथमच घडत आहे,’ असे सांगत शिंदे यांना टोला लगावला.  भाषणात राज यांनी भाजपबद्दल अवाक्षर न काढता एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मशिदींवरील भोंगे आणि समुद्रातील अतिक्रमण हटवा

राज्यातील गेल्या दोन-अडीच वर्षांतील राजकीय अस्थिरता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष फायदा उठवीत धर्माध शक्ती माहिम येथील समुद्रात दुसरा हाजी अली दर्गा उभारत आहेत. याबाबतची चित्रफीत जनसमुदायास दाखवीत राज ठाकरे यांनी  हे अतिक्रमण महिनाभरात हटवावे, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस व पालिका आयुक्तांकडे केली. ही कारवाई झाली नाही तर दग्र्याशेजारीच मोठे गणपती मंदिर उभारले जाईल, त्यातून जे काही घडेल त्याची आम्हाला पर्वा नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी सरकारला दिला. भोंग्यांचा विषय मनसेने सोडला नसून ते बंद झालेच पाहिजे, असे सांगताना मागील आंदोलनात १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी शिंदे यांच्याकडे केली.

पेरले तेच उगवले

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आपल्यावर अन्याय कसा झाला हे राज्यभर सांगत फिरत आहेत. करोनाकाळात ते आमदारांना भेटत नव्हते.  ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत जे पेरले, अनेकांना पक्षांतून बाहेर काढण्यासाठी जी कटकारस्थाने केली, त्याचाच हा परिपाक असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा गौप्यस्फोटही केला. पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानुसार  वाद मिटल्याचे बाळासाहेबांना सांगितले. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसमोर न येता हा वाद तसाच ठेवत माझ्या बदनामीची मोहीम राबविली.

जनतेची कामे करा, मुख्यमंत्र्यांना सल्ला 

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ सभांचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना राज ठाकरे यांनी सूचक इशारा दिला. मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी काम करा. उगाचच उद्धव ठाकरे यांच्यामागे सभा घेत बसू नका, असा टोलाही त्यांनी हाणला.

शिवधनुष्य शिंदे यांना झेपेल का?

शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून जो वाद सुरू होता. त्या वेळी वेदना झाल्या, लहानपणापासून आपण ज्या पक्षात वाढलो, पक्ष मोठा होताना पाहिले, अनेकांनी घाम गाळून पक्षाला मोठे केले, त्याची अशी अवहेलना होताना वेदना झाल्या. बाळासाहेबांचे हे शिवधनुष्य एकाला झेपले नाही, दुसऱ्याला झेपेल का माहीत नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना उद्देशून लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 02:14 IST
Next Story
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या खर्चात पाच हजार कोटींनी वाढ
Exit mobile version