राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली होती. यावर तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली होती. 

दरम्यान, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान जवळपास एक तासाच्या चर्चेनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी याविषयीची माहिती दिली. नितीन सरदेसाई म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. उद्यापर्यंत यावर तोडगा काढणार असल्याचे शरद पवार प्रयत्न करणार आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करवा अशी मागणी आम्ही केली. 

बाळा नांदगावकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे त्यांना तात्काळ भेटण योग्य नव्हत. त्यामुळे राज ठाकरे शरद पवारांना भेटले. हा फायनान्सचा विषय असल्याने शरद पवारांची भेट घेतली. ते यावर योग्य मार्ग काढतील असा विश्वास आहे. तसेच शरद पवार आणि राज ठाकरे या विषयावर मुख्यमंत्र्याना भेटणार आहेत.