मुंबई : महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी हिरीरीने विरोधात निवडणुका लढविलेले राजकीय शत्रूही एकत्र येत असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नगरसेवकांची पळवापळव सुरु आहे. सत्तेसाठी रस्सीखेच आणि राजकीय आघाड्या स्थापन होत आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याविरोधात निवडणूक लढविलेल्या ठाकरे बंधूंमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडली असून मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल,’ असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर केले आहे. तर सत्तेसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) कधीही लाचार होणार नाही आणि शिंदे यांना पाठिंबा देणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिंदे यांच्या शिवसेनेस पाठिंबा देण्याच्या मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या निर्णयास पक्षनेतृत्वाची संमती होती, असे सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमधूनही हेच संकेत असून आपण लवचिक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्त्व सहज फेकली जातात आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झाले आहे ’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवा – जाधव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. ठाकरे यांना बाजूला ठेवून महापौरपदासाठी राजकीय प्रयोग करणे चुकीचे आहे. उलट शिंदे यांनी मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान ठेवण्यासाठी ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे जाधव यांनी नमूद केले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी शिंदे यांनी धाडस दाखवावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही – संजय राऊत

शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मात्र सत्तेत बसण्यासाठी आम्ही तत्वांशी तडजोड करणार नाही. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे यांचा पाठिंबा घेणार नाही. आमच्यावर इतके वाईट दिवस आलेले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तरीही पाठिंब्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. सत्ता मिळावी नाही, म्हणून आमचा जीव तडफडत नाही, भाजपला सत्तेची हाव असून पैशांचा अफाट वापर करुन त्यांनी निवडणुका लढविल्या व जिंकल्या. यावरुन त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसून येते, अशी टीका राऊत यांनी केली.