मुंबई: राज्यात मशिदींवरील भोगें उतरविण्यावरुन राजकारण तापले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतूक करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ सत्तेचे भोगी असल्याची जहरी टीका केली.

राज्यात मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मेची मुदत दिली असून त्यानंतर मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मतैक्य करण्याचा प्रयत्न केला होता. या बैठकीत भोंग्याबाबत केंद्र सरकारने धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. तर मनसेने ३ मेनंतर आंदोलनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला होता. भोंग्याबाबत राज्यात गोंधळाची परिस्थिती असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र योगी सरकारने अनेक मशिदींवरील भोगें उतरविण्यास सुरुवात केली आहे. योगी सरकारच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहिली असून, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून या कारवाईबद्दल आभारही मानले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांची परवानगी

औरंगाबाद : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत विविध अटींवर सभेस परवानगी देण्यात आली आहे. मात्र सांस्कृतिक मंडळाची आसनक्षमता केवळ पंधरा हजार एवढी असून त्या पेक्षा अधिक व्यक्ती येऊ नयेत, ढकलाढकली होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना परवानगी पत्रात दिली आहे.  या शिवाय कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी दुचाकी तसेच चारचाकीची रॅली काढू नये. सभेदरम्यान कोणतेही शस्त्रे-तलवारी, स्फोटके जवळ बाळगू नयेत तसेच धार्मिक भेद पसरविला जाईल, अशी विधाने न करता सभा घ्यावी, असे नमूद करण्यात आलेले आहे.