मुंबई :  अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार तीन ठिकाणी पोलिसात तक्रार नोंद (एफआयआर) करण्यासाठी गेले. पण, राज्य सरकारचा पोलिस यंत्रणेवर दबाव असल्यामुळे तिन्ही ठिकाणी तक्रार दाखल करून घेतली नाही. एफआयआर नोंद होऊ नये, असे सरकारला असे का वाटते ? सरकारच्या भूमिकेमुळे संशय वाढत आहे. अपघात धुक्याने झाला की, धोक्याने झाला, हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. या प्रश्नावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलले पाहिजे, त्या गप्प का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला धारेवर धरले.

अजित पवार यांच्या विमान अपघातावरून संशय वाढला आहे. अपघात धुक्याने झाला की, धोक्याने झाला, असा संशय निर्माण होत आहे. सरकारी दबावामुळे अजित पवार यांच्या सारख्या नेत्याच्या अपघाताबाबत तक्रार नोंदवून घेतली जात नसेल सामान्यांचे काय. मरीन ड्राईव्हला पोलिस तक्रार नोंद करून घेत होते, तितक्यात पोलिस उपायुक्त तिथे आले आणि त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तक्रार नोंद करून घेऊ नका, असा सरकारकडून दबाव का येतो. तक्रार नोंदवून का घेतली जात नाही, सरकार तक्रार नोंद करू का करू देत नाही, सरकार एफआयआरला का घाबरते, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

सुनेत्रा पवार गप्प का ?

अपघात प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलले पाहिजे. त्या गप्प का. अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी रोहित पवार यांची अपेक्षा असेल तर त्यात गैर काय. सरकारने रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली पाहिजेत.  विमानाचे कितीही नुकसान झाले तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. मग या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाला, असे का सांगितले जाते. अपघात प्रकरणी राज्य सरकारच संशयाची भुते नाचवित आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.