मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाल्याचं आणि नागरिकांचे हाल झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. झाडं कोसळण्याच्या घटना, चाळ पडून सहा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून दोन मृत्यू, बसवर झाड पडून ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू या सगळ्या घटनांनी मुंबई हळहळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक, मुंबईतल्या या घटना या सगळ्यावर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी आर.जे. मलिष्काच्या गाण्याचा उल्लेख करत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

आठ वर्षांपूर्वी आलं होतं मलिष्काचं गाणं

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७-२०१८ च्या आसपास आर. जे. मलिष्काचं एक गाणं आलं होतं. “मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही का? मुंबईच्या रस्त्यांमध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे खोल खोल, खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल, मुंबई तू माझ्यासंगे गोड बोल” असे शब्द असलेलं हे गाणं मुंबईकरांच्या तोंडी अगदी सहज रुळलं. आजही खड्डे पडले की मुंबईकरांना या गाण्याची आठवण होतेच. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतंच, शिवाय या गाण्याचे विविध रिल्सही आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच व्हिडीओचा उल्लेख करत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

आर. जे. मलिष्काचा उल्लेख करत काय म्हणाले राज ठाकरे?

कोण ती बाई? मलिष्का मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाही का? म्हणणारी कुठे आहे ती? नवीन व्हिडीओ तिने केलाय का? केला असेल तर चांगलं आहे. तेव्हा मलिष्का गात होती तुम्ही सुख घेतलंत. आता दुसरे बोलायला लागले तर त्रास व्हायला लागला. मिसिंग लिंक वगैरे उत्तम दर्जाचा आहे. यावरुन कुणी राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री आहेस ना? ही काय भाषा? मुख्यमंत्र्याची भाषा. बरं विधानसभेत मुख्यमंत्री मराठीत बोलले त्यानंतर लगेच हिंदीत सुरु झाले. कशासाठी? महाराष्ट्राची विधानसभा मराठी आमदारांची. हिंदी कुणासाठी? कदाचित त्यांना आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईन. असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मलिष्काच्या गाण्याचा व्हिडीओ (सौजन्य-Red FM)

शहरांचा विचका झालाय ज्याला सरकार विकास म्हणत आहेत-राज ठाकरे

सोशल मीडियावर जे काही हे लोक करत होते ना आता ते त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण आता लोक त्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे सगळ्या शहरांचा विचका झालाय, ज्याला हे लोक विकास म्हणत आहेत. मी या प्रश्नांवर इतकी वर्षे बोलतो आहे. आपल्याकडे विकास आराखडा येतो पण टाऊन प्लानिंग होत नाही. शहरं बरबाद झाली आहेत, आणखी बरबाद होणार आहेत. नुसते रस्ते, उड्डाणपूल म्हणजे विकास नाही असंही राज ठाकरे म्हणाले.