मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनाला आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरुवात केलीय. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात आधी पाडव्याच्या सभेमध्ये यासंदर्भात इशारा दिल्यानंतर १२ एप्रिल रोजी ठाण्यातील सभा आणि १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेमध्ये यावरुन सरकारला अल्टीमेटम दिला होता. ३ मे चा हा अल्टीमेटम संपल्यानंतर आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे भोंगे वाजलेल्या मशिदींबाहेर स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवली. याच पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरेंनी आज त्यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (कायदा व सुव्यवस्था) यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.
९० ते ९२ टक्के सकाळची अजान नाही
सकाळपासूनच मला कार्यकर्त्यांचे, पोलिसांचे फोन येतायत, असं राज ठाकरेंची प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितलं. माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नोटीस पाठवताय, ताब्यात घेतायत. पण हे आमच्या बाबतीत का घडतंय हे कळत नाही. जे कायद्याचं पालन करतायत त्यांना तुम्ही सजा देणार असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना राज यांनी आज ९० ते ९२ टक्के ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, अशीही माहिती दिली. आज अजान न वाजवणाऱ्या मौलवींचे मी आभार मानेन की त्यांना आमचा विषय समजला, असंही राज म्हणाले.
ही कल्पनेबाहेरची गोष्ट
“लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदांवरील भोंग्यांचाच हा भाग नाही. मंदिरांवरचे ही आहेत,” असंही राज म्हणाले. पुढे पुन्हा विश्वास नांगरे-पाटलांचा संदर्भ देत मशिदींवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडे इतके अर्ज आले इतक्याला परवानगी दिली, अशी माहिती दिली. मात्र पुढे बोलताना राज यांनी, “आता मुंबईत, महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्या बहुतांशी अनधिकृत आहेत. सरकार त्याला परवानगी देते अधिकृत. ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. ही परवानगी कशासाठी कोणासाठी देताय?,” असा प्रश्न राज यांनी विचारलाय.
रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे
पुढे बोलताना, “हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता नाहीय दिवसभर चार ते पाच वेळा बांग दिली जाते ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोक त्या त्या वेोळी हनुमान चालिसा वाजवणार,” असंही राज म्हणाले. “तुम्ही, ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता. दिवसाची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची देणार कशासाठी? यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे, सुप्रीम कोर्टाच्या नियमांमध्ये बसून,” असंही राज म्हणाले.
भोंगे डेसिबलमध्येच लागले पाहिजेत
रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचा धंदा आहे का पोलिसांना?, असा संतप्त सवाल राज यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. पुढे बोलताना, “तुम्हाला माइक आणि स्पीकर कशाला लागतो कोणाला ऐकवायचं आहे तुम्हाला? हे भोंगे उतरवले गेले पाहिजे जोपर्यंत उतरवले जाणार नाही तोपर्यंत हे असं सुरु राहणार,” असं राज म्हणाले. “जे सरकार सांगतंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय तर पूर्ण करा असं आमचं म्हणणं आहे. आज ९२ टक्के ठिकाणी झाली नाही तर आम्ही खूष असू असं वाटत असेल तर आम्ही अजिबात खूष होणार नाही. भोंगे डेसिबलमध्येच लागले पाहिजेत,” असं राज म्हणाले.
तर आम्ही धार्मिक वळण देऊ
ज्या ज्या मशिदींबाहेर भोंगे वाजतील त्या त्या मशिदींच्या बाहेर हनुमान चालिसा वाजत राहणार असा इशारा राज यांनी पुन्हा एकदा दिला. तसेच, हा सामाजिक विषय आहे याचा उल्लेख राज यांनी पुन्हा एकदा करत, “धार्मिक वळण द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ,” असा इशारा दिला.
हे कोणत्या काळात जगतायत
“आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? ती पण मोबाईलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार? हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का? एवढा मुर्खपणा, हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही,” असा टोला राज यांनी सरकारला लगावला.
पोलीस काय कारवाई करणार
“महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलिस कमिशनर, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल,” असंही राज म्हणाले.
तोपर्यंत हे आंदोलन राहणार
“३६५ दिवस दिवसभरात चार चार पाच पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा… पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा. हा एका दिवसाचा विषय नाही ४ तारीख पकडू नका जो पर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार,” असं राज म्हणाले.
नांगरे-पाटलांचा फोन आलेला
पुढे बोलताना राज यांनी, “मला तो मुंबईचा रिपोर्ट आलाय त्याप्रमाणे मुंबईमध्ये ११४० मशिदी आहे १३५ मशिदींमध्ये अजान पाच वाजायच्या आत लावली गेली. मला काल नांगरे-पाटलांचा फोन आलेला. सकाळची अजान लावणार नाही असं ते म्हणाले होते. मग या ज्या १३५ मशिदींमध्ये भोंगे वाजले त्यावर कारवाई करणार की नाही?,” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना, “या मशिदींवर कोणती कारवाई करणार की आमच्याच मुलांना उचलणार?” असा प्रश्नही राज यांनी विचारला. त्याचप्रमाणे, हा श्रेयाचा विषय नाहीय हा विषय सामंजस्याने हाताळले तर हा सगळ्यांचा विषय आहे, असंही राज म्हणाले.