मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुलदर्शिका २०२७ चं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईत हा सोहळा रंगला होता. या सोहळ्यात राज ठाकरे यांनी पु.ल. देशपांडे यांची एक खास आठवण सांगितली. बाळासाहेब ठाकरे आणि पु.ल. देशपांडे यांच्यात वाद झाला होता ज्यानंतर राज ठाकरे पु.ल. देशपांडे यांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. त्यावेळी काय झालं होतं? तो किस्सा राज ठाकरेंनी सांगितला आहे.

राज ठाकरेंनी सांगितली पु. ल देशपांडेंची आठवण

पुलंना बघण्याचा अनुभव अनेकदा आला होता, पण भेटण्याचा प्रसंग एकदाच आला. तो प्रसंगही खूप गंमतीशीर आणि वेगळा आहे. कारण बाळासाहेबांचा आणि पुलंचा वाद झाला होता, त्यानंतर साधारण ६ महिने झाले होते. तेव्हा मला वाटलं की पुलंना जाऊन भेटावं. मग मी माझे सासरे मोहन वाघ यांना फोन केला. त्यांना सांगितलं मला पुलंना भेटायचं आहे, काय करता येईल? त्यावर मला ते म्हणाले ठीक आहे मी बोलतो.

बाळासाहेब ठाकरेंचा विषय निघाला आणि…

मोहन वाघ त्यांच्याशी बोलले आणि मला सांगितलं उद्या सकाळी ८ वाजता घरी जायचं. मी तिथे पोहचलो, आतली इमारत होती. तिथे मी चालत चाललो होतो. माझ्या मागून एक माणूस चालत होता. मी इमारतीत शिरलो, तो पण शिरला. मी बेल वाजवली, मागून आवाज आला की राज इथे राहतो आम्ही. सुनीता बाई होत्या. मी आतमध्ये गेलो. दरवाजा होता आणि एका बाजूला पुस्तकं होती. पुलंची तब्बेत तेव्हा खालावली होती. समोर खुर्चीवर बसले होते, तो माणूसही येऊन बसला. तो त्यांच्या परिचयाचा होता. मग मला सुनीताबाई सांगत होत्या. बाळासाहेबांचा विषय निघाला. त्या म्हणाल्या, राज, बाळ हा भाईचा विद्यार्थी आणि श्रीकांत हा माझा विद्यार्थी. ज्यानंतर बाजूला बसलेल्या माणसाने मान उंच करून पुलंकडे पाहिलं आणि म्हणाला बाळासाहेब तुमचे विद्यार्थी, त्यावर पुलं लगेच म्हणाले आता आदर वाढला असेल ना माझ्याबद्दल? त्यांची प्रकृती बरी नसतानाही विनोदबुद्धी शाबुत होती असं म्हणत राज ठाकरेंनी हा खास किस्सा सांगितला.

बाळासाहेबांच्या बरोबरही मी गेलो होतो आणि नंतर पुलंना भेटलो होतो-राज ठाकरे

पुढे राज ठाकरे म्हणाले की मी मग त्यांना भेटून बाहेर आलो. बाळासाहेबांना तिथूनच फोन केला. त्यांना पुलंची प्रकृती बरी नाही हे सांगितलं. तसंच लवकर भेटून घे असंही सांगितलं. मग बाळासाहेबांना मी पुण्याला घेऊन आलो. दोघांची चांगली भेट झाली. हे डेज जे म्हणतो तेव्हा त्यांची भेट व्हायला हवी होती. पण आजारपणात का होईना पु.ल. देशपांडेंना भेटणं हे काही कमी झालं का? असं राज ठाकरे म्हणाले.