मुंबई: मुंबई आणि आजूबाजूचा महानगर प्रदेश गुजरातला जोडण्याची केंद्र सरकारची दीर्घकाळापासूनची योजना आहे. त्यासाठी अदानी उद्योग, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील जमिनीवर कब्जा केला जात असून, पद्धतशीरपणे मराठी माणसांना या भागातून हद्दपार केले जात आहे. मराठी माणूसच राहिला नाही तर महापालिका काय कामाची, असे सांगतानाच मुंबई वाचविण्याची ही शेवटची संधी असून, सर्वपक्षीय मराठी माणसांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी भावनिक साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घातली.

मुंबई विमानतळ कायमचे बंद पाडून, ही जागा अदानीला देण्याचा केंद्र सरकारचा डाव असून, या निवडणुकीत चुकलात तर कायमचे मुकाल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या युतीच्या शिवशक्ती मेळाव्यात ठाकरे बोलत होते. संपूर्ण भाषणात राज यांनी अदानी उद्योग समूहावर केंद्र आणि राज्य सरकारची कशी मेहरबानी आहे याचा उदाहरणासह पाढा वाचला.मराठी माणसांचा वापर करून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचेही ते म्हणाले. गेल्या २० वर्षांत आपण प्रथमच युती करीत असून, कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मुंबईवरील संकटामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असे प्रारंभीच स्पष्ट करीत ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या धोरणावरून पुन्हा एकदा फडणवीस सरकारला धारेवर धरले.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकार मनमानीपणे वागत असून, त्यांना जनमताची कदर नाही. निवडणुका जिंकण्याचे तंत्र समजल्यानेच भाजपची हिंमत वाढली आहे. त्यामुळेच पैसे फेकून माणसांना विकत घेता येते, बदलापुरात बलात्काराचा आरोप असलेल्या आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. तुळजापुरात अमली पदार्थ तस्कराला उमेदवारी दिली. अपक्ष नगरसेवक निवडून आणण्याची हिंमत भाजपने केली असून येत्या काळात हीच नवी प्रथा सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.

अदानी लक्ष्य

गेल्या दहा वर्षांत झपाट्याने श्रीमंत होणारा अदानीसारखा जगात दुसरा उद्योजक नसेल. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून अदानी उद्योग समूहाची भरभराट झाली असून, देश व्यापल्यानंतर गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रही व्यापून टाकला आहे. मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ बांधण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आता मुंबई विमानतळावरील वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे वळवून मुंबई विमानतळ बंद पाडण्याचा आणि ती सर्व जमीन अदानीच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, ज्यांना तुरुंगात टाकले, त्या छगन भुजबळ किंवा अजित पवार यांच्या माडीला मांडी लावून बसता, हे कसे चालते. निवडणूक प्रचारात वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणून मुंबईत भाषिक वाद भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपण एकटे असलो तरी त्यांना भारी आहोत. माझा भाषेवर राग नाही मात्र, आमच्यावर हिंदी लादणार असला तर लाथ मारू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. मराठीचा अपमान करणारा कोण तो अण्णामलाई, कृपाशंकर सिंह, असा सवालही त्यांनी केला.कोटसध्या मराठी माणसांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी मराठी माणसांचा वापर केला जात असून, विविध मार्गाने जमिनींवर कब्जा केला जात आहे. अशा परिस्थितीत एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल. – राज ठाकरे, मनसेप्रमुख