कोलकात्यात रविवारी झालेल्या सीबीआय विरुद्ध पोलिसांच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. सीबीआयच्या कारवाईविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांना सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठींबा जाहीर केला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपला पाठींबा दर्शवला आहे. राज यांनी फेसबुक पोस्टद्वारे नरेंद्र मोदींविरोधात ममता बॅनर्जींना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

राज म्हणतात, राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले आहेत. नरेंद्र मोदींनी राजकीय स्वार्थासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये.

आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये. केंद्राच्या एकाधिकारशाहीविरोधात ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याचे मी जाहीर करतो, असे राज यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.