Uddhav Thackeray Raj Thackeray Interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये मुंबईसंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी महेश मांजरेकर यांनी मुंबईसंदर्भात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सविस्तर भाष्य केलं. तसेच, मुंबईच्या आजच्या स्थितीबाबत दोघांनी सविस्तर निरीक्षणंही नोंदवली.

महेश मांजरेकर म्हणतात, मला लाज वाटते…

मुंबईत आपली मुलं वाढणार असल्याची लाज वाटते, असं महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीवेळी ठाकरे बंधूंना सांगितलं. “गेल्या तीन वर्षांत महानगरपालिका निवडणुका झाल्याच नव्हत्या. मग त्या तीन वर्षांत मुंबई धोक्यात नव्हती का? एक मुंबईकर म्हणून जेव्हा मी आज घराबाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स १८३ आहे”, असं महेश मांजरेकरांनी म्हणताच उद्धव ठाकरेंनी घसा दुखत असल्याचं सांगत “ते आज मी भोगतोय” असं म्हटलं.

मुंबई डिकंजेस्ट कधी होणार? असा प्रश्न यावेळी महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांनीही सविस्तर भूमिका मांडली. मुंबईच्या आजच्या अवस्थेला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? याबाबत ठाकरे बंधूंनी त्यांचे मुद्दे मांडले.

नियोजनशून्य विकास हेच याचं कारण – उद्धव ठाकरे

मुंबईच्या स्थितीसाठी नियोजनशून्य विकास कारणीभूत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. “आज जितकं प्रदूषण दिसतंय, एवढं आधी कधी झालं होतं. कारण आत्ता यांची विकासाची गती नसून विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास हे याचं कारण आहे. एकतर आओ-जाओ घर तुम्हारा इथूनच खरी सुरुवात होते. तुम्हाला नेमकं हवंय काय? आज सगळीकडे रस्ते खोदले आहेत. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो, उड्डाणपूल उभे केले जात आहेत. ते हवेतच, पण ते एकाच वेळी काम काढल्यामुळे मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ तुम्ही बसवला पाहिजे. तुम्ही भरत असलेल्या कराच्या बदल्यात तुम्हाला प्रदूषण मिळतं. तुमच्या घरापासून निघालेला रस्ता थेट हॉस्पिटलला जातो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबईत कांदळवनं आहेत. पण विकासाच्या नावाखाली ती कांदळवनं कापली जातात. समुद्रकिनाऱ्यावरची कांदळवनं कापल्यानंतर त्याची भरपाई चंद्रपुरात करणार आहेत. या विकासाचा काय उपयोग होणार?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

राज ठाकरेंना मांडला पुनर्विसाकासाचा मुद्दा…

दरम्यान, यावर राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या पुनर्विकासांचा मुद्दा उपस्थित केला. “याला एक कारण म्हणजे विकासाची मोठी कामं. पण दुसरं कारण म्हणजे पनवेल, ठाणे, नवी मुंबई या भागांत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास चालू आहे. आपल्याकडे डीपी बनतो. पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पण पुणे लवकरात लवकर बरबाद होईल”, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

“सरकारी जागांना आई-बापच नाहीत”

मुंबईत खासगी जागांवर झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण होत नाही असंही राज ठाकरे म्हणाले. “काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता राज्य म्हणून पाहाणं गरजेचं आहे. गोदरेजची जागा खासगी आहे. तिथे एकही झोपडी नाही. पण केंद्र, राज्य व पालिकांच्या जागांना आई-बापच नाहीत. अनेकदा अशा अनधिकृत गोष्टी पाडल्या गेल्या. पण नंतर तिथले कुणीतरी अधिकारी त्यांना पुन्हा मदत करतात. या सगळ्यावर वचक बसणं गरजेचं आहे”, असं त्यांनी नमूद केलं.