मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे आणि त्याबाबतची भूमिका रविवारी २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत स्पष्ट करणार असल्याचे समाजमाध्यमांवरून जाहीर केले. प्रकृतीच्या कारणास्तव ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे मनसेकडून सांगितले जात असले तरी या दौऱ्यात सुरक्षा देण्यास उत्तर प्रदेश सरकारने नकार दिल्यामुळे ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केल्याचे समजते.

ठाकरे यांनी अचानक दौरा स्थगित केल्याने राजकीय कार्यक्रम व भूमिकेवरून अनिश्चिततेची मनसेची परंपरा कायम राहिली असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला हात घालत ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेकडूनही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या १५ जूनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणप्रकरणी माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा देत भाजपचे गोंडाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी  या दौऱ्यास विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यास समर्थन दिले असले तरी उत्तर प्रदेशातून भाजपचे कोणीच राज यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाही.   १५ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून अयोध्येत मोठे शक्तिप्रदर्शन करून राज यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. राज  यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी आम्ही सुरक्षा पुरविली असती, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना मसनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी, आता एवढेच बाकी राहिले होते. महाभारतातही संजय होता ना. मग ते सोबत असले तरी आम्हाला काही चिंता नाही. आम्हाला सुरक्षा आपोआप मिळेल. त्यामुळे त्यांनी आमच्या बरोबर यावे, असा टोला लगावला.