मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रदशिर्त झालेला रितेश देशमुख लिखित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सिनेमागृहांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते अंंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण देशाच्या अस्मितेचा कणा आहे. त्यांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’ हे केवळ राज्यव्यवस्था नसून न्याय, समानता, स्त्रीसुरक्षा, शेतकरी संरक्षण व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित एक आदर्श शासनपद्धती होती. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित अभिनेता रितेश देशमुख लिखित – दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट कर मुक्त करण्यात यावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पत्रात केली आहे.

अंबादास दानवे आपल्या पत्रात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण देशाच्या अस्मितेचा कणा आहे. त्यांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’ हे केवळ राज्यव्यवस्था नसून न्याय, समानता, स्त्रीसुरक्षा, शेतकरी संरक्षण व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित एक आदर्श शासनपद्धती होती.

सदर “राजा शिवाजी” या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रभावी मांडणी करण्यात येत असून, त्यांच्या पराक्रमासोबतच लोककल्याणकारी दृष्टिकोन, प्रशासन कौशल्य, गनिमी काव्याची रणनीती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसमोर सशक्तपणे उभे राहणार आहे. विशेषतः युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यास हा चित्रपट उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे चित्रपट समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा, तसेच विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला तो सहज उपलब्ध व्हावा, यासाठी सदर चित्रपटास राज्य शासनाकडून करमुक्ती देणे अत्यंत आवश्यक आहे. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, “राजा शिवाजी” या चित्रपटास महाराष्ट्र राज्यात करमुक्त घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधिताना निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्राद्वारे आपणाकडे करीत आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.