मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या कामकाजापासून दूर करण्यात आलेले मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी मंगळवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या शोध समिती संदर्भातील निर्णयाला स्थगिती दिली होती. याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
डॉ. वेळूकर यांच्या कुलगुरूपदाबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने शोध समितीने पात्रता निकष पुन्हा तपासून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, अशा आशयाचा आदेश दिला होता.
दरम्यान राज्यपालांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत कुलगुरूंना कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. या पाश्र्वभूमीवर वेळूकरांनी मंगळवारी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांचा ठाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ही भेट अवघी १० ते १५ मिनिटे झाल्याचे राजभवनतर्फे सांगण्यात आले. यावेळी वेळूकरांनी राज्यपालांकडे आपली बाजू मांडली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत राजभवनाकडे आल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. वेळूकर यांच्या या भेटीनंतर पुन्हा उलट सुलट चर्चाना सुरुवात झाली आहे.