मुंबई : राजावाडी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात तीन बाळांचा मृत्यू गंभीर वैद्यकीय परिस्थितीमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन संबंधित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांसह संबंधित डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचारांची संपूर्ण माहिती घेतली.
प्रसूती विभागातील या तीनही प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची वैद्यकीय स्थिती, करण्यात आलेल्या तपासण्या, उपचारपद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आलेली वैद्यकीय कार्यवाही याबाबत भांदिर्गे यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. पहिल्या प्रकरणात हिरा भंडारी या ३७ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. ही त्यांची प्रसूतीची तिसरी वेळ असून, दोन वेळा त्यांचे सिझेरियन प्रसूती झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केल्यावर गर्भाच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू आले नाहीत. त्यामुळे तातडीने सोनोग्राफी करण्यात आली. या तपासणीत गर्भाशयातील गर्भाचा मृत्यू झाल्याचे निदान झाले. यावरून पुढील तपासणीमध्ये विलंब झाल्याचे दिसून येत नसल्याचे रुग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात रेहाना बेगम खान या ३३ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्यामुळे त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला होता. मात्र त्या १५ दिवस तपासणीसाठी आल्याच नाहीत. त्यानंतर रुग्णालयात आल्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये गर्भामध्येच बाळाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
तिसऱ्या प्रकरणात ४० आठवडे आणि दोन दिवसांची गर्भवती असलेल्या महिलेचा प्रसूतीचा कालावधी उलटून गेला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान अर्भकाने गर्भामध्येच विष्ठा केल्याचे आढळून आल्याने रुग्णास तातडीने शस्त्रक्रियागृहामध्ये नेऊन सिझेरियन करण्यात आले. मात्र बाळाच्या हृदयाचे ठोके मंद असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचार सुरू असतानाच सुमारे दीड ते दोन तासांनंतर बाळाचा मृत्यू झाला.
या तिन्ही घटनांमध्ये रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि निर्धारित उपचार पद्धतीनुसार केलेल्या कार्यवाहीची माहिती हरीष भांदिर्गे यांनी घेतली. रुग्णांच्या उपचारात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय प्रतिसाद मिळावा, यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन महापालिका रुग्णालयांतील वैद्यकीय सेवांचा नियमित आढावा घेण्यात येईल, असे हरीष भांदिर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.
