मुंबई : दिवंगत महानायक राजेश खन्ना यांच्या मालकीचा वांद्रे येथील प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगला ‘भुताटकी’, ‘शापित’, ‘अशुभ’ असल्याचा प्रसार करण्यापासून उच्च न्यायालयाने अनेक विविध प्रसारमाध्यमे आणि यूट्यूब वाहिन्यांना रोखले आहे.अशा प्रकारची माहिती प्रसारित करणे सकृतदर्शनी बदनामीकारक आणि घरमालकाच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच, बंगल्याबाबत असा बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यापासून मनाई केली.

वांद्रेस्थित कार्टर रोडवरील या बंगल्याचे सध्याचे मालक आणि व्यावसायिक शशी किरण शेट्टी यांनी दाखल केलेल्या दाव्यावरील सुनावणीच्या वेळी न्यामूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने उपरोक्त आदेश दिले. शेट्टी यांनी अंतरिम दिलासा मिळण्यासाठी एक भक्कम सकृतदर्शनी बाजू मांडली आहे. मागितलेला दिलासा पूर्णपणे न्याय्य आहे. समाजमाध्यमांवरील मजकूर स्पष्टपणेबदनामी करणारा आहे. हा बंगला भुताटकी आणि तथाकथित शापित असल्याचे मजकूरात नमूद केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अशा प्रकारचा मजकूर याचिकाकर्त्यांच्या शांततेने आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारावरही गदा आणण्यासारखा आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

प्रतिवादींपैकी एकाचा अपवाद वगळता, कोणत्याही प्रसारमाध्यम संस्थेने किंवा मजकूर निर्मिती करणाऱ्याने या आक्षेपार्ह मजकूराचे समर्थन करण्यासाठी न्यायालयात उपस्थित लावली नाही. अशा प्रकारची माहिती प्रसारित करणे अयोग्य आणि खळबळ माजवण्याच्या उद्देशाने आहे. यात याचिकाकर्त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक मानसिक त्रास आणि नुकसान होईल, असे निरीक्षणही न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देताना नोंदवले आणि सर्व प्रतिवादींना तीन आठवड्यांत आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश देऊन सुनावणी २१ ऑगस्टला ठेवली.