महाराष्ट्रातील पहिला करोना ओमायक्रॉन विषाणू रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडला. यानंतर राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तसेच ओमायक्रॉनच्या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी काय करावं याचंही उत्तर दिलंय. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यात एकूण २८ नमुन्यांची ओमायक्रॉन विषाणू संसर्गाची चाचणी केली जात आहे. त्यातील १२ नमुने कस्तुरबा रुग्णालयात आहेत आणि १६ नमुने नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी येथे आहेत. या २८ नमुन्यांचा अहवाला यायला २-३ दिवस लागतील. त्यानंतर त्यांच्या संसर्गाबाबत माहिती कळेल.”

जनतेने काय काळजी घ्यावी?

“जनतेने कोविडच्या नियमांचं १०० टक्के पालन करावं आणि करोना विरोधी लसीकरण घ्या. या दोनच गोष्टी आहेत, त्या कुठल्याही परिस्थितीत न चुकता कराव्यात एवढीच माझी नम्रतेची विनंती महाराष्ट्राच्या जनतेला आहे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

“घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही”

राजेश टोपे म्हणाले, “ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात सापडला आहे. मागील ४-५ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील ज्या रूग्णावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते तो रूग्ण ओमायक्रॉन बाधित निघाला आहे. असं असलं तरी घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण अभ्यास केला तरी तिथंही मृत्यू दर नाही. मोठ्या प्रमाणात रुग्णालयात रूग्ण दाखल होण्याचं प्रमाणही नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो. ओमायक्रॉन विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता खूप आहे.”

आता आपल्याला काय करावं लागेल?

“आता आपल्याला या ओमायक्रॉन रूग्णाचे जवळचे संपर्क असलेल्या व्यक्तींचे नमुने घेऊन हा संसर्ग तपासावा लागेल. कारण मला तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार एखादा व्यक्ती ५ मिनिटं जरी ओमायक्रॉन रूग्णाच्या जवळ बसला तरी तो या विषाणूने बाधित होतो. या विषाणूचा संसर्ग तर खूप आहे हाच काळजीचा विषय आहे. म्हणूनच या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून संसर्गाची माहिती घ्यावी लागेल. तसेच संसर्ग थांबवावा लागेल. ही काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “घाबरण्याचं शून्य टक्के कारण, फक्त या २ गोष्टी…”, राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

राजेश टोपे पहिल्या ओमायक्रॉन रूग्णाच्या लक्षणांविषयी बोलताना म्हणाले, “या रूग्णाला सौम्य लक्षणं आहेत. ही लक्षणं डेल्टा विषाणूप्रमाणेच आहेत. यात खोकला, सर्दी, अंगदुखी, ताप अशी लक्षणं आहेत. यावर सध्या अभ्यास सुरू आहे. नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आज तरी आपण आपल्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”