ते वाईट असले, तरी त्यांनी सरकारला स्वतहून पाठिंबा दिला आहे. मग आम्ही तो का नाकारायचा? जे पक्ष आणि आमदार आम्हाला पाठिंबा देतील त्यांचे आम्ही स्वागतच करणार, कारण आम्हाला विकासाच्या मुद्दय़ावर सरकार चालवायचे आहे, असा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याचे आज केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी जोरदार समर्थन केले. सत्तेतील सहभागासाठी शिवसेनेशी चर्चा सुरु असून सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यावर आणि पक्षाच्या प्रभारीपदाची जबाबदारी संपल्यावर रुडी प्रदेश भाजप कार्यालयात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना रुडी म्हणाले, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले. पण वाईट लोकांनी विकासासाठी पाठिंबा दिला, तर तो नाकारणे चुकीचे ठरले असते. ‘सरकार पूर्णपणे स्थिर असून ते किती काळ टिकवायचे, ते जनतेने ठरवावे,’ असे मत रुडी यांनी व्यक्त केले.राज्यातील सरकार पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठिशी भक्कमपणे असून केंद्राकडून भरीव निधी देऊन या संकटाचा राज्य सरकार मुकाबला करेल, असे विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रुडी यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. देशात पाच कोटी तरुणांना रोजगार निमिर्तीसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाणार असून हे काम आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.