scorecardresearch

हिंदी पुस्तकांचा शहरदौरा… दोनच दिवस शिल्लक…

नेहरु सेंटर वरळी येथे रविवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्याचे आज आणि उद्या हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे या सोहळ्याला मराठी वाचकांचीही उपस्थिती आवश्यक आहे.

rajkamal publication, hindi book exhibition, mumbai
हिंदी पुस्तकांचा शहरदौरा… दोनच दिवस शिल्लक… ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

कुण्याएके काळी नाही तर दोनच दशकांपूर्वीपर्यंत मुंबई शहरातल्या हिंदी वाचकांचा पैस फार मोठा होता. शुद्ध साहित्यिक पुस्तकांचा वाचक ‘प्रेमचंदां’पासून नव्वदीत गाजू लागलेल्या लेखकांपर्यंत. शिवाय ‘पल्प फिक्शन’च्या ठोकळे कादंबऱ्या उपनगरांतल्याही रद्दीवाल्यांच्या फडताळ सुशोभित करण्याच्या कामी असत. सुरेंद्र मोहन पाठक, अमित खान, राजभारती, वेदप्रकाश शर्मा, एस.सी. बेदी, ओम प्रकाश शर्मा यांचा मराठी वाचकही सर्वदूर पसरलेला. दोन हजारोत्तर काळात मुंबई शहरातून आणि उपनगरांतून पहिले पल्प फिक्शनचा भर ओसरला. त्या कुणी वाचत नाहीत म्हणून नाही, तर भरपूर मागणी असल्याने. ॲमेझाॅनवर आणि ऑनलाइन पुस्तक यंत्रणेत या पुस्तकांना दहापट किंमत आल्याने रद्दीवाल्यांपासून ते असतील तिथून या लगदा साहित्याला विलुप्त केले गेले. मुख्य धारेतील साहित्याच्या वाचकांची हक्काची हिंदी पुस्तक दुकाने ओसरायला सुरुवात झाली. धोबीतलावजवळ असणाऱ्या हिंदी पुस्तक अड्ड्यांपैकी ‘परिदृश्य प्रकाशन’ हे अजूूनही देशभरातील प्रकाशकांशी स्वत:ला जोडून राष्ट्रभाषेतील कथापुस्तके उपलब्ध करून देत आहे. हिंदीत नव्या येणाऱ्या सर्व पुस्तकांसाठी हे एकच स्वतंत्र दालन मुंबईकरांना उपलब्ध आहे. याधर्तीवर राजकमल प्रकाशनाचा पुस्तकांचा शहरदौरा उत्तम कथात्म साहित्य मिळविण्यासाठी एक पर्वणी म्हणून इथल्या वाचकांनी पाहायला हवा. नेहरु सेंटर वरळी येथे रविवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्याचे आज आणि उद्या हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे या सोहळ्याला मराठी वाचकांचीही उपस्थिती आवश्यक आहे.

कार्यक्रमांची रेलचेल…

पुस्तकांच्या प्रकाशनातून होणाऱ्या ज्ञानप्रसारामुळेच समाजाचे भले होऊ शकते, आपली राष्ट्रभाषा ही क्लीष्ट नसून सर्वांना सहससाध्य भाषा बनू शकते, असे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. या ग्रंथसोहळ्याचे प्रकाशन भालचंद्र नेमाडे, साहित्यिक लक्ष्मण गायकवाड आणि हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिसमिल्लाह यांनी केले. ‘या ग्रंथयात्रेद्वारे हिंदीने मराठी भूमीत येऊन दोन्ही हातांनी आपले साहित्यधन ओतले आहे, आणि मराठी वाचकांनी त्याला ह्दयाशी कवटाळले आहे’, या शब्दांत बिसमिल्लाह यांनी उद्घाटनप्रसंगी आपले विचार मांडले. गौरव सोलंकी (ग्यारवी ए के लडके या गाजलेल्या कथासंग्रहाचे लेखक) यांनी या प्रसंगी कथाअभिवाचन केले. त्यानंतर काव्यमैफलीचा आस्वाद वाचकांनी घेतला. दुसरा दिवस पियुष मिश्रा आणि गुलजार यांच्या काव्यधारेने गाजविला. मात्र मराठीसाठी महत्त्वाची गोष्ट होती, ती ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्यांच्या हिंदी आवृत्त्यांच्या प्रकाशनाची. पत्रकार अंबरिश मिश्र आणि हिंदी-मराठी भाषिक दूत म्हणून कार्य करणारे जयप्रकाश सावंत यांनी त्यावर चर्चा केली. भारतीय दलित साहित्याच्या भावी दिशांवर लक्ष्मण गायकवाड, शरणकुमार लिंबाळे आणि अब्दुल बिस्मिल्लाह यांनी चर्चासत्र घडविले. मराठीतील लक्ष्मण गायकवाड आणि शरणकुमार लिंबाळे यांच्या आत्मकथनांना हिंदीत मराठीहून अधिक वाचक आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या या सर्वाधिक हिंदीत आल्या आहेत. गुलजार यांच्या ‘जिया जले’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशनही याच दिवशी येथे झाले. विमलचंद्र पांडे हे हिंदीतील आजच्या घडीचे लोकप्रिय लेखक. गेल्या काही वर्षांपासून सिनेमाक्षेत्रातील कामामुळे मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांचा मारणमंत्र हा कथासंग्रह नुकताच आला आहे. त्यांची इथल्या मंगळवारच्या काव्यसत्रात उपस्थिती होती.

हेही वाचा… मध्य रेल्वेने वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ

आज आणि उद्याचे आकर्षण…

लोकप्रियतेच्या परिप्रेक्ष्यात कालातीत साहित्य याविषयावरच्या परिसंवादात आर्थर काॅनन डाॅयल यांच्या शेरलाॅक होम्स मालिकेवर साहित्यिक संजीव निगम आणि रवींद्र कात्यायन यांच्यात चर्चासत्र होईल. समकाल मे किरकिरी या या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ममता सिंह यांच्या किरकिरी या संग्रहाचे साहित्यिक असगर वजाहत यांच्याकडून प्रकाशन होणार आहे. गुरुवारी दुपारी ‘नाटक कंपनीसे सिनेमातक’ यावर रंजीत कपूर, सीमा कपूर आणि ग्रुशा कपूर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. ‘माहीम मे कत्ल’ या जेरी पिंटो यांच्या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन शांता गोखले यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय जेरी पिंटो यांची मुलाखत ऐकण्याचीही पर्वणी आहे. सारंग उपाध्याय यांची ‘सलाम बाॅम्बे व्हाया वर्सोवा डोंगरी’ ही कादंबरी काही महिन्यांपूर्वी तद्भव या साहित्यिक मासिकात प्रसिद्ध झाली होती. तिचे पुस्तकरुपी प्रकाशन अनुराग चतुर्वेदी यांच्याहस्ते होणार आहे. गुरुवारी या पुस्तक सोहळ्याच्या भैरवी गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांच्या मुलाखतीने होणार आहे.

हेही वाचा… मुंबईमध्ये प्रथमच करण्यात आली रोबोटिक यकृत दान शस्त्रक्रिया

उत्तम ग्रंथ संग्रहासाठी…

गीतांजली श्री यांची बुुकर इंटरनॅशनल विजेती ‘रेत समाधि’ ही कादंबरी तर येथे मिळेलच, पण त्यासह राजकमलने प्रकाशित केलेले त्यांचे कथासंग्रही येथे आहेत. त्यात प्रातिनिधिक कहानीसंग्रह (निवडक गीतांजली श्री) देखील मिळू शकतील. त्याशिवाय गेल्या सहा दशकातील महत्त्वाच्या हिंदी लेखकांच्या निवडक कथासंग्रहामध्ये गेल्या दीड दशकात खूप लोकप्रिय झालेल्या मनोज रुपडा यांच्या कथाही उपलब्ध आहे. मराठीत भरपूर चाहतावर्ग असलेल्या गीत चतुर्वेदी यांच्या ‘सावंत आँटी की लडकीयाँ’ आणि ‘पींक स्लीप डॅडी’ या दीर्घकथासंग्रहांच्या नव्या आवृत्त्याही येथे उपलब्ध आहेत. जगातील इतर भाषांमध्ये गाजलेल्या पुस्तकांचे हिंदी अनुवाद असलेले विस्तृत दालन आहे. हिंदीत अनुवादित पुस्तकांचे जगही किती व्यापक आहे, हे कळण्यास हे दालन मदत करू शकेल. याशिवाय राजकमल प्रकाशनाच्या गेल्या कित्येक वर्षांतील खुपविक्या पुस्तकांची येथे रेलचेल आहे.

हेही वाचा… मध्य रेल्वेवरील एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल

थोडे प्रकाशनाविषयी…

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही महिने आधी सुरू झालेल्या हिंदीतील ‘राजकमल’ प्रकाशनाने आपल्या प्रगतीशील ७५ वर्षांच्या कारकीर्दीत इथल्या महत्त्वाच्या लेखकांना जगप्रसिद्ध करण्याचा वीडा उचलला. या प्रकाशनाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे मराठीसारखीच हिंदीत जी ‘नई कहानी’ लिहिली गेली ती याच प्रकाशनाच्या ताफ्यातील लेखकांकडून. साठोत्तरीतील भारतीय फिक्शन अनुवाद करून देशभरात पोहोचविण्याचे काम या प्रकाशनाने केले. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले लेखकच नाही तर ‘इंटरनॅशनल बुकर’ पारितोषिक विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांची प्रवाला सोडून पोहणारी कथा नव्वदीच्या दशकात छापण्याची दूरदृष्टीही या प्रकाशनाने दाखविली. हिंदीचा वाचकपट्टा प्रचंड मोठा असल्याने प्रकाशकांची, पुस्तकांची आणि नव्या चांगल्या लेखकांची वानवा या भाषेला कधीच नव्हती. त्यातून उत्तम लेखक निवडत त्यांच्या पुस्तकांना गाजविण्याच्या प्रांतात फक्त ‘वाणी’ आणि ‘राजकमल’ या दोन प्रकाशकांचा हात कुणीच धरू शकत नाही. राजकमल प्रकाशनाने गेल्या वर्षभरात भोपाळ, बनारस, पाटणा आणि चंडीगढ या राज्यांमध्ये पुस्तकदौरा आखला आहे. महाराष्ट्रात मुंबईत या प्रकाशनाने ग्रंथप्रदर्शनाचा पहिला मुक्काम केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या