मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. पहिल्या टप्यातील ५० बस एप्रिल १५ तारखेपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्या नागपूरला देण्यात येणार आहेत. या बसमुळे महामंडळात पुन्हा ३ बाय २ चा प्रवास सुरू होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे तीन हजार बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार आहे. सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे.

फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता. या सोहळ्याला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महामंडळात पुन्हा ३ बाय २

गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बस महामंडळाने खरेदी केल्या आहेत. या नव्या बसना ‘हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ’ असे नाव दिले आहे. सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी आहे. नव्या बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचे एसटीचे नियोजन आहे. सुमारे १ तासापेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरिता जिल्ह्यांमध्येच या बस चालविण्यात येणार आहेत.