मुंबई : कोकणातील नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना प्रति हेक्टर पाच लाख आणि नुकसानग्रस्त काजू बागायतदारांना प्रति हेक्टर तीन लाख रुपये भरपाई देण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काढण्यात येणार होता.

पण, गिरगाव चौपाटी येथे पोहोचलेल्या शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानावर पाठवण्यात येत आहे. गिरगाव चौपाटी येथे प्रमुख नेते अद्याप आलेले नाहीत. पण कोल्हापूरवरून आलेल्या राजू शेट्टी समर्थकांना गिरगाव चौपाटी येथे गाड्यांमधून उतरूनही दिले जात नाही. आंदोलक आलेल्या गाड्या आंदोलकांसह थेट आझाद मैदानावर पाठवण्यात येत आहेत.

चौपाटीवरून जाणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांची धरपकड

आंदोलनाला न आलेले पण, गिरगाव चौपाटीवरून जात असलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानाच्या दिशेने माघारी पाठविण्यात आले. त्यांना वर्षा बंगल्याच्या दिशेने जाण्यास मज्जाव केला. गिरगाव चौपाटी वरून वर्षा बंगल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे. राजकीय नेते असलेली एकही गाडी वर्षा बंगल्याच्या दिशेने सोडली जात नाही. सर्व गाड्या माघारी पाठवल्या जात आहेत. त्यामुळे वैयक्तिक कामासाठी आलेल्या राजकीय नेत्यांनाही विनाकारण आझाद मैदानाच्या दिशेने पाठवण्यात येत आहे. सर्वच गाड्यांची तपासणी होत असल्यामुळे मलबार हिलच्या दिशेने जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांना विनाकारण तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

शेट्टी, सपकाळ, राऊत, पवारांसह अडीचशे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते विनायक राऊत, दीपक पवार आदी प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलकापर्यंत माध्यम प्रतिनिधींना पोहचू दिले जात नाही. त्यासाठी मोठा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान, मंत्रालय, पायधुनी आणि गिरगाव चौपाटीवरून सुमारे अडीचशे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंदोलनात कोकणी शेतकरी दिसेना

कोकणातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याची घोषणा राजू शेट्टीने केली असली, तरीही प्रत्यक्षात मोर्चात कोकणी शेतकरी दिसत नाही. राजू शेट्टी यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते आणि मुंबई शहरातील स्थानिक शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी येताना दिसत आहेत. प्रत्यक्षात कोकणी शेतकरी मात्र आंदोलनात कुठेच दिसत नाही.