खासदार राजू शेट्टी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणेच राज्य सरकारला आर्थिकदृष्टय़ा डोईजड झाले असताना आता त्यांना मोफत वीज देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वीज हा महत्वाचा घटक असून ती मोफत पुरविण्यात यावी, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली असून २६ जुलैपर्यंत ठोस पावले न टाकल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफीमध्ये केंद्र सरकारनेही आर्थिक वाटा उचलावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. अजून त्याची प्रक्रिया मार्गी लागलेली नसून निधीची तरतूदही झालेली नाही. रोखे, कर्ज, विविध खात्यांकडे शिल्लक असलेली रक्कम, बँकांकडून हप्ते अशा विविध पर्यायांचा वापर करुन निधी उभारण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यातच आता मोफत वीजेचीही मागणी सुरु झाली आहे. सध्या कृषीबिलांची थकबाकी २० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. दर तिमाहीला ८०० ते ९०० कोटी रुपयांची बिले पाठविली जातात आणि वसुली मात्र १०० कोटी रुपयेही होत नाही. वसुलीचे प्रमाण १०-१२ टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांना आठ तासही वीज मिळत नाही. वीजगळतीचे प्रमाण अधिक असून गळती व चोरीच्या वीजेचे खापर शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. चुकीची वीजबिले पाठविली जातात, असे वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचेही म्हणणे आहे.