‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काही अटींवर आणि मुद्दय़ांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. शेतकरी आणि अन्य विषयांबाबत एनडीएच्या जाहीरनाम्यात समावेश केल्यास पाठिंबा देण्याचा विचार केला जाईल, असे शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. मात्र स्वाभिमान संघटनेची लोकसभेच्या सात जागांची मागणी असून त्यावरून मात्र तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेट्टी यांनी ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. साखरेच्या प्रश्नावर रंगराजन समितीच्या शिफारशी आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत ठरविण्याबाबत स्वामिनाथन समितीच्या शिफारशी अंमलात आणणे, नद्या जोड प्रकल्प आणि राष्ट्रीय दुष्काळ निवारण कार्यक्रम अशा काही मुद्दय़ांचा समावेश जाहीरनाम्यात केल्यास स्वाभिमान संघटना एनडीएसोबत जाण्यास तयार आहे.
त्याचबरोबर संघटनेला इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, माढा, बारामती, उस्मानाबाद व बुलडाणा अशा सात जागा हव्या आहेत. मुद्दय़ांची मागणी मान्य झाल्यास जागांबाबत तडजोड करण्याची संघटनेची तयारी आहे. यापैकी काही जागा शिवसेनेच्या कोटय़ातून द्याव्या लागतील. याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.