scorecardresearch

Premium

राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत

मराठी भाषेविषयी सतत चिंता व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही केले जातात, पण ज्यांच्यावर मायमराठीच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी आहे

राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत

मराठी भाषेविषयी सतत चिंता व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही केले जातात, पण ज्यांच्यावर मायमराठीच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच मराठीची हेळसांड पाहायला मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळ. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आयुष्यभर आपले सर्व लेखन आवर्जून मराठीतच केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणाऱ्या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही. राजवाडे यांच्या निधनानंतर वर्षभरातच (१९२७) या मंडळाची स्थापना झाली. इतिहासाचे अभ्यासक-संशोधक यांना संदर्भ साधने पुरवणे, त्यांना ऐतिहासिक अभ्यासासाठी चालना देणे हे या मंडळाचे प्रमुख काम आहे. पण याची माहिती देणारे मंडळाचे संकेतस्थळ http://rajwademandal.org मात्र इंग्रजीमध्ये आहे.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले.
राजवाडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या मंडळात १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रे, त्यापैकी तीस हजार हस्तलिखिते आहेत. त्यातील बहुतांशी मराठी असून बाकीची पíशयन, मोडी, पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये आहेत, तर मंडळाच्या ग्रंथालयात २७ हजार मराठी व इंग्रजी पुस्तके आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेणाऱ्या, त्याचा अभ्यास करणाऱ्या कुणालाही मोलाची ठरेल अशी साधनसामग्री मंडळाकडे आहे, पण त्याची माहिती देणारे मंडळाचे संकेतस्थळ मात्र इंग्रजीमध्ये असल्याने त्याचा उपयोग अभ्यासक -संशोधक यांना म्हणावा तसा होत नाही. इंग्रजी तरी नीट असावे, तर तसेही नाही. संकेतस्थळाच्या मुख्य पानावरच स्पेिलगच्या अनेक चुका आहेत. त्यामुळे इतर भाषकांवर एका मराठी संशोधन संस्थेची छाप पाडण्याचा या संकेतस्थळाचा हेतू असलाच, तर तोही साध्य होण्याची शक्यता नाही!
मायमराठीचे कडवे पुरस्कर्ते असलेले राजवाडे जे लेखन भारतीय पातळीवर जायला हवे ते इंग्रजीमध्ये अनुवादित करून घेत, पण आपले लेखन मात्र मराठीतूनच करत. इतर भाषकांना आपले लेखन अनुवादातूनच माहीत व्हायला हवे, अशी राजवाडे यांची धारणा होती.
२००२पासून संगणकावर आणि महाजालावर सर्व भारतीय लिप्यांत लिहिण्याची आणि तो मजकूर सरसकट दिसण्याची सोय उपलब्ध झाली आहे. युनिकोड संकेतप्रणाली वापरून आपल्याला कोणत्याही भारतीय लिपीत संकेतस्थळ रचता येते. आज मराठीत कित्येक संकेतस्थळे देवनागरी लिपीतच सहज वापरता येतात. पण २०१० पासून सुरू असलेले मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीमध्ये आहे. हयातभर मायमराठीसाठी खस्ता खाणाऱ्या राजवाडे यांचा त्यांच्याच नावाने चालणाऱ्या मंडळानेच केलेला पराभव म्हटला पाहिजे.
मध्यंतरी मंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संकेतस्थळ मराठीत करू शकलो नाही. सध्याचे इंग्रजी संकेतस्थळही घाईगर्दीत झालेले आहे. चालू वर्ष हे राजवाडे यांचं दीडशेवे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करत असून ते अत्याधुनिकही केले जाणार आहे.
संजय मुंदडा, कार्याध्यक्ष, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान
jansatta-bhupesh-baghel-interview
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajwade research centers website in english

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×