मुंबई: राज्यसभा निवडणुकीतील दोन तगडय़ा उमेदवारांपैकी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे ३४० कोटींचे तर केंद्रीय मंत्री व भाजपचे पीयूष गोयल हे १०० कोटींचे धनी आहेत. एवढी मालमत्ता असणाऱ्या पटेल यांच्या नावावर एकही गाडी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रफुल्ल पटेल यांनी सन २०१६मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तेव्हा त्यांची मालमत्ता २५२ कोटींची होती. गेल्या सहा वर्षांत त्यात सुमारे १८८ कोटींची भर पडली आहे. पटेल यांनी सोमवारी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार जंगम मालमत्ता १४ कोटी ३६ लाख, तर पत्नीची जंगम मालमत्ता ३४ कोटी १२ लाख आणि एकत्र कुटुंबाची जंगम मालमत्ता ८० कोटींच्या घरात आहे. पटेल यांच्याकडे एक कोटीचे, तर पत्नीकडे सहा कोटी ४४ लाखांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. तर घरे, जमीन, व्यापारी जागा अशी ७५ कोटींची स्थावर मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर तर १०४ कोटी ५६ लाखांची मालमत्ता पत्नीच्या आणि १०७ कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावे आहे. विशेष म्हणजे पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही. तसेच १४ कोटींचे दायित्व आहे.

गोयल यांच्याही मालमत्तेत वाढ

केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याही मालमत्तेत गेल्या सहा वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांत गोयल यांच्या ढोबळ वार्षिक मिळकतीमध्ये ३८ लाखांवरून ६२ लाख अशी घसघशीत वाढ झाली. सहा वर्षांपूर्वीची ९० कोटींची मालमत्ता आता १०० कोटींच्या पलीकडे गेली असून गोयल यांच्याकडे टोयोटा करोला अल्टीस, टोयोटा कॅमरीच्या दोन अशा तब्बल ८३ लाखांच्या गाडय़ा आहेत. गोयल यांची जंगम मालमत्ता २९ कोटींची आणि पत्नीची ५० कोटींची आहे. गोयल दाम्पत्याकडे साडेसात किलो सोन्याचे दागिने, तसेच हिरे- मोती असून शेअर बाजारात विविध कंपन्यांमध्ये ७ कोटींचे शेअर्स आहेत. तसेच पुणे, मुंबईत घरे, व्यापारी गाळे अशी सुमारे २१ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यांच्याकडे कुठेही भूखंड नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha elections praful patel declares assets worth 340 cr piyush goyal worth 100 crore zws
First published on: 31-05-2022 at 03:18 IST