रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना अखेर भाजपच्या कोटय़ातून आणि महाराष्ट्रातूनच राज्यसभेची खासदारकी देण्याचे निश्चित झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या बैठकीत आठवलेंना उमेदवारी देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीला शिफारस करण्याचे ठरले. त्यानुसार भाजपकडून आठवले यांची सोमवारी अधिकृत उमेदवारी जाहीर होईल आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे रिपाईंतील सूत्राकडून सांगण्यात आले.
राज्यसभेच्या खासदारकीसाठी रामदास आठवले गेल्या वर्षांपासून शिवेसना-भाजपच्या मागे लागले आहेत. शिवसेनेने हात वर केल्यानंतर आठवले यांनी भाजपच्या कोटय़ातून खासदारकी मिळविण्यासाठी मुंबई, दिल्लीत प्रयत्न सुरु केला. भाजपने सुरुवातीला मध्य प्रदेश किंवा बिहारमधून त्यांना राज्यसभेवर पाठविता येते का याची चाचपणी केली, परंतु दोन्ही राज्यातून भाजपच्या नेतृत्वाने अनुकूल प्रतिसाद दिला नाही, असे कळते. त्यामुळे आठवले यांचा हट्ट पुरविण्यासाठी महाराष्ट्रातूनच त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचे ठरले.
दिल्लीतच आठवले यांच्या उमेदवारीवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासूनच भाजपमध्ये वेगाने घडामोडी सुरु झाल्या. गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी सकाळीच आठवले यांना आपल्या वरळी येथील निवासस्थानी बोलावून घेतले. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, तसेच रिपाईंचे अविनाश महातेकर, अर्जून डांगळे, तानसेन ननावरे आदी नेते उपस्थित होते. भाजपकडून आपल्याला राज्यसभेची खासदारकी मिळेल, परंतु लोकसभेची एकही जागा दिली जाणार नाही, त्यासाठी आपण शिवसेनेकडे आग्रह धरावा, असा सल्ला भाजप नेत्यांनी आठवले यांना दिल्याचे समजते.
त्यानंतर दुपारी मुंडे, आठवले आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, रामदास कदम, आदी नेते उपस्थित होते. भाजपतर्फे आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीकडे शिफारस करण्याचे ठरले. त्यामुळे आठवले यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र त्यांच्या हट्ट पुरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कापावा लागला. भाजपकडून राज्यसभा मिळणार असल्याने आता लोकसभेच्या किमान दोन तरी जागा मिळाव्यात, यासाठी रिपईंच्या वतीने शिवसेनेकडे आग्रह धरला जाणार आहे, असे सांगण्यात आले.