नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मंगळवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे आदेश दिले. ही बैठक तब्बल पाच तास चालली. रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठीचा ‘मास्टर प्लॅन’ सांगताना कामात कुणी निष्काळजीपणा केल्यास हयगय केली जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पोलीस क्लबच्या प्रेरणा हॉलमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी ७ पर्यंत सुरू होती. या बैठकीला सर्व ९२ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हजर होते. यापूर्वी जे झाले ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
वाहतूक पोलिसांनीही वाहतूक व्यतिरिक्त इतर गुन्ह्यांकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले.  महिला आणि लहान मुलांची प्रकरणे संवेदनशीलतेने हाताळा, असेही त्यांनी बजावले. मी पोलीस ठाण्यात कधीही भेट देईन, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरेंचा मारियांना पाठिंबा
राकेश मारिया हे चांगले पोलीस अधिकारी असून मुंबईला त्यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मारिया यांच्या नियुक्तीचे समर्थन केले. रे रोड येथे ब्रिटानिया पंपिंग केंद्राचे भूमीपूजन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे मतप्रदर्शन केले. सेवाज्येष्ठता नाकारल्याने नाराज झालेले पोलीस अधिकारी विजय कांबळे यांच्या बाजूने रिपब्लिकन पक्ष उतरला असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र मारिया यांची बाजू घेतली आहे.