मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे राकेश मारीया यांनी स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यांतील कामचुकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक धास्तावले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागात काम केलेल्या मारीया यांच्या कामाची पद्धत अनेक अधिकाऱ्यांना परिचित असून आता कसेही वागून चालणार नाही, याची कल्पना असल्यानेच यापैकी काहींनी आपले वजन वापरून बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर काही जण रजेवर जाण्याच्या तयारीत आहेत.  
आतापर्यंतच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर कमालीचा वचक राहिला आहे. रॉनी मेंडोन्सा, एम. एन. सिंग, अनामी रॉय, संजीव दयाळ, शिवानंदन, अरुप पटनाईक यांचा अधिकाऱ्यांना धसका होता. डॉ. सत्यपाल सिंग यांनीही आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने पोलीस दलावर पकड ठेवली होती. मात्र या सर्वापेक्षा मारीया यांच्या नुसत्या नावाने आणि त्यांच्या सकाळी ८ ते रात्री ८ सतत काम करण्याच्या कार्यपद्धतीने वरिष्ठ निरीक्षकच नव्हे तर गुन्हे विभागाचे विद्यमान अधिकारीही धास्तावले आहेत.
गुन्हे अन्वेषण विभाग तसेच राज्याच्या दहशतवादविरोधी विभागात काम करणारे अधिकारी एखाद्या प्रकरणाची उकल होईपर्यंत घरीही जात नव्हते. हा धाक आता पोलीस ठाण्याच्या पातळीवरही येईल आणि तो ताण असह्य़ होईल, याची जाणीव असलेले काही वरिष्ठ निरीक्षक बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्तांच्या मंगळवारी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मारीया यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. कामचुकार अधिकाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा संदेशच या बैठकीतून देण्यात आला आहे.
अनेक वरिष्ठ निरीक्षकांना खोटा ठावठिकाणा सांगून घरी वा अन्य ठिकाणी बसून राहण्याची सवय आहे तर काही कामचुकार अधिकारीही राजकीय वरदहस्तामुळे वरिष्ठ निरीक्षकपद टिकवून आहेत. परंतु हे सर्व अधिकारी आता अस्वस्थ झाले आहेत. आपल्या सहकाऱ्यांकडे ते भीती व्यक्त करून दाखवित आहेत.

पुन्हा टॉप टेन..
प्रत्येक पोलीस ठाणे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील सर्वात खतरनाक अशा दहा गुंडांची यादी तयार करण्याचे आदेश मारीया यांनी दिल्यामुळे मुंबईत पोलीस दलात ‘टॉप टेन’ची सद्दी पुन्हा सुरू झाली आहे. एम. एन. सिंग यांनी सुरुवातीला ही पद्धत कार्यान्वित केली होती. अरुप पटनाईक यांनी गुंडांच्या कार्यपद्धतीनुसार त्याला अ, ब, क आदी श्रेणी दिली होती.