बॉलीवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी बुधवारी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एका ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली. त्यामुळे आता रामगोपाल वर्मा आणि आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यात आता रामगोपाल वर्मा यांनी आव्हाड यांच्यासारखा विदुषक दुसऱ्यांनी काय बोलायचे हे ठरवणार का, असे विधान केल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

काल महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रामोगपाल वर्मा यांनी एक ट्विट केले होते. जगातील सर्व महिलांनी पुरूषांना सनी लिओनीइतका आनंद द्यावा,  असे या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर ट्विटरवर अनेकांनी रामगोपाल वर्मा यांच्या विधानावर टीका करण्यास सुरूवात केली. रामूने या नकारात्मक प्रतिक्रियांना रामूने आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत रामगोपाल वर्मा यांना लक्ष्य केले. रामगोपाल वर्मा यांनी माफी मागावी, अन्यथा पुढील परिणामांसाठी तयार राहावे, आम्ही कायदा हातात घ्यायला कचरणार नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. आव्हाडांच्या या ट्विटला रामगोपाल वर्मा यांनीही दंड थोपटून उत्तर दिले. तुम्ही जर कायदा हातात घेण्याच्या विधानाबद्दल माफी मागितली नाही तर तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करेन. तुमचा निर्णय मला सांगा, असे ट्विट करून वर्मा यांनी आव्हाडांना आव्हान दिले. त्यानंतर आव्हाडांनीही तुम्ही तक्रार करूनच दाखवा, असे म्हटले. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.