‘श्रीदेवी यांचे आयुष्य पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे’

श्रीदेवी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात नाराज होत्या

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत दाखल होईल आणि त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा मृत्यू शनिवारी झाला, त्यानंतर दुबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर त्यांचे पार्थिव त्याच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांचे आयुष्य पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे होते असे म्हटले आहे. श्रीदेवी यांच्या चाहत्यांच्या नावे त्यांनी एक पत्र लिहिले आहे ज्यात त्यांनी हा उल्लेख केला आहे. हे पत्र रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.

काय आहे रामगोपाल वर्मा यांची फेसबुक पोस्ट?

श्रीदेवी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात नाखुश होत्या. इंग्लिश-विंग्लिश सिनेमाच्या सेटवरची धमाल वगळता त्या कायम निराश असत. भविष्यातील अनिश्चितता, व्यक्तीगत आयुष्यात येणारे उतार-चढाव यांसारख्या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होत होते. लहानपणापासूनच श्रीदेवी यांनी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिले. त्यांच्या आयुष्यात आंतरीक समाधान त्यांना लाभले नाही.

सौंदर्य, अभियन क्षमता, पाठिंबा देणारे कुटुंब, दोन मुली असे सुखी आयुष्य त्या जगत होत्या असे अनेकांना वाटत होते. मात्र वास्तव वेगळे होते. मी त्यांच्यासोबत चित्रपट केले आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबाबत माहिती आहे. श्रीदेवी या स्वच्छंदी होत्या, आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यासारखे त्यांचे आयुष्य होते. मात्र त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांचे आयुष्य पिंजऱ्यात बंद करण्यात आलेल्या पक्ष्याप्रमाणे झाले. त्याचे कारण त्यांची आई होती. त्यांची आई श्रीदेवी यांची गरजेपेक्षा जास्त काळजी करत होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर अनेक बंधने आली.

हिंदी सिनेसृष्टीत एक काळ असा होता की अभिनेते आणि अभिनेत्री त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी काळा पैसा स्वीकारत होते. त्यामुळे श्रीदेवी यांच्या वडिलांनी श्रीदेवी यांना मिळालेले पैसे नातेवाईकांकडे ठेवले होते. मात्र श्रीदेवी यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर श्रीदेवी यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्यांचे पैसे परत केलेच नाहीत. त्यामुळे श्रीदेवी आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. तसेच त्यांच्या आईने त्यांच्याबाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतले. अशावेळी श्रीदेवी यांच्या आयुष्यात बोनी कपूर आले. बोनी कपूर यांनी त्यांना आधार दिला आणि सावरले. असेही रामगोपाल वर्मा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ram gopal varmas fb post reveals details of sridevis trouble in her personal life