राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. असे वक्तव्य विनोद तावडे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांनी आज बुधवारी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा घेराव घालून जाब विचारला. त्यांना उत्तर देताना तावडे म्हणाले की, ‘प्रसार माध्यमांवर जी राम कदम यांची क्लिप दाखवली जाते, तसे वकव्य करणे चुकीचेच आहे. जर यामध्ये ते दोषी आढल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.’

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. महादेव जानकर आणि विनोद तावडे यांना घेराव घालून या वक्तव्यचे स्पष्टीकरण मागितले. ‘राज्यातील मखलाशी बंद करा व असल्या विकृतीला तातडीने हाकलून द्या’ अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या उत्सवात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.’आम्ही जिजाऊच्या लेकी, पळवुन दाखवा, राम कदमांचा चौरंग करु’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

काय होते वादग्रस्त वक्तव्य –
”उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन”

राम कदम यांचे स्पष्टीकरण –
भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून टीका होते आहे. विरोधकांनी माझा व्हिडिओ मोडतोड करून पोस्ट केला, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण राम कदम यांनी दिले आहे.