मुंबई : अमेरिकेशी मैत्री निभावताना आम्ही नेमके कुठे कमी पडलो? असा प्रश्न वॉशिंग्टनमध्ये एका चर्चासत्रात उपस्थित करताना, भारताची तेल आयात आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत वस्तुस्थितीला धरून नसलेली विधाने केल्याबद्दल जाहीर माफी मागण्याची नामुष्की भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्यावर ओढवली.
अमेरिकेच्या सांगण्यावरून भारताने रशिया, इराणकडून तेल आयात थांबवली, तसेच अमेरिकेने लादलेले ५० टक्के आयातशुल्क भारताने मुकाट मान्य केले, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतात रशियन तेलाची आयात लक्षणीय घटली असली तरी, भारताने अमेरिकेच्या सांगण्यावरून रशिया, इराणकडून तेल आयात कमी केल्याचे कधीच मान्य केले नव्हते.
परंतु, भारतासारख्या सार्वभौम देशाचा इतर देशांशी असलेल्या व्यापार संबंधांवर अमेरिका प्रभाव टाकत असल्याचे माधव यांच्या विधानामुळे सूचित होत होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपचीही चांगलीच अडचण झाली. चूक लक्षात येताच माधव यांनी ‘एक्स’वरून जाहीर माफी मागत आपण केलेले भाष्य तथ्याला धरून नसल्याचे स्पष्ट केले.
प्रकरण काय?
वॉशिग्टन येथे ‘अमेरिका-भारत संबंधांसाठी प्रगतीचे नवे मार्ग’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. अमेरिकेने सांगितले त्याप्रमाणे, भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबविले. विरोधी पक्षांच्या टीकेनंतरही आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे थांबविले. भारताने फारशी खळखळ न करता ५० टक्के आयात शुल्कही स्वीकारले. मग भारत कुठे कमी पडला, असा प्रश्न राम माधव यांनी उपस्थित केला होता.
