मुंबई : नमित मल्होत्रा प्रस्तुत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या हिंदी चित्रपटाची पहिली झलक गुरूवार, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता एकाच वेळी भारतातील ९ शहरात पीव्हीआर चित्रपटगृहात दाखविण्यात येणार आहे. ‘रामायण : द इंट्रोडक्शन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाची पहिली वहिली झलक मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या शहरांमध्ये भव्यदिव्य सोहळ्यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
देशभरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ‘रामायण : द इंट्रोडक्शन’ चित्रपटासंदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी एकाच वेळी ९ शहरांत पहिली झलक दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत हा कार्यक्रम ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात पार पडणार असून प्रेक्षकांनाही उपस्थित राहता येणार आहे. हा चित्रपट भारत आणि परदेशातील कलाकार व तंत्रज्ञांच्या साथीने भव्य स्तरावर तयार करण्यात येत आहे.
‘रामायण : द इंट्रोडक्शन’ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. याशिवाय, रावणाची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता यश साकारत असल्याने एकूणच या चित्रपटाविषयी चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सनी देओलने आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच पौराणिक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय, हिंदी दूरचित्रवाहिनीवर लोकप्रिय असलेला अभिनेता रवी दुबे या चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील कलाकार आणि ‘दंगल’, ‘छिछोरे’सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे.