मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘भीमशक्ती’ यांच्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाच्या तख्तापर्यंत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञता ‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केली. त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या दशकपुर्तीनिमीत्त चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी नागरी सत्कार करण्यात आला.

आंबेडकरी चळवळीतल्या विचारवंतानी मला भाकरी फिरवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी शिवसेना-भाजपसोबत युती केली. त्या युतीची पुढे महायुती झाली. २०२९ मध्ये केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत येईल आणि मी पुन्हा राज्यमंत्री बनेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

आठवले यांनी ‘दलित पँथर’च्या माध्यमातून संघर्ष केला. संघर्षातून ते पुढे आले तरी त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल कटुता नाही. कोणत्या पक्षाबद्दल, कोणत्या जातीबद्दल, कोणत्या व्यक्तीबद्दल तेढ नाही. ते नेहमीच सर्वांशी सुसंवाद साधत राहिले. महायुतीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे ते केंद्रात मंत्री बनू शकले. पुढची १० वर्षे केंद्रात आठवले मंत्री राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आठवले हे खरे अनुयायी असून सामाजिक न्यायाच्या चळवळीचे त्यांनी सम्यक नेतृत्व केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, भाजप आमदार प्रविण दरेकर यांची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी चारोळ्या करत आठवलेंना शुभेच्छा दिल्या. आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत, ‘रिपाइं’ सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यावेळी उपस्थित होते.