मुंबई : ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (रिपाइं) अध्यक्ष रामदास आठवले यांची एप्रिलमध्ये राज्यसभेची मुदत संपत असून केंद्रातले राज्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी हवी आहे.. भाजप कोट्यातून राज्यसभा मिळवण्यासाठी आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप बरोबर तडजोड केल्याची पक्षात कुजबूज असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

आठवले यांनी मुंबईत १७ जागांची मागणी केली होती. शेवटच्या दिवसांपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. अखेर आठवले यांच्या ३९ कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवले यांच्याशी चर्चा केली. भाजपा आणि शिवसेना यांनी प्रत्येकी ६ जागा ‘रिपाइं’ला देण्याचे मान्य केले. या जागांवरचे त्या दोन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेतील असा निर्णय झाला. मात्र संबंधित उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत.

‘रिपाइं’च्या २६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.‘रिपाइं’चे १३ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व स्वबळावर व महायुतीशी मैत्रीपूर्ण लढती करणार आहेत. २०११ पासून ‘रिपाइं’ हा राष्ट्रीय लोकशाही दलाचा (एनडीए) घटक पक्ष आहे. ‘रिपाइं’ला भाजपाने मुंबईत पालिका निवडणुकीत २०१७ मध्ये १७ आणि २०१२ मध्ये २४ जागा सोडल्या होत्या. यावेळी मात्र एकही जागा सोडलेली नाही. मुंबईत ‘रिपाइं’चे १३ उमेदवार रिंगणात असातान आठवले मात्र महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

आठवले यांच्या ‘रिपाइं’चा महाराष्ट्रात एकही आमदार नसताना भाजपने २०१४ मध्ये त्यांना राज्यसभा दिली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये आठवले यांना केद्रात राज्यमंत्री पद दिले. दलित मतदारांशी जुडण्याच्या भाजपच्या प्रयत्नाचा तो भाग होता. आठवले यांना २०२० मध्ये दुसऱ्यांदा भाजपने राज्यसभा दिली. आणि मोदी यांनी २०२४ मध्ये पुन्हा आठवले यांची राज्य मंत्री पदावर वर्णी लागली.

एप्रिल महिन्यात आठवले यांची राज्यसभेची मुदत संपते आहे. त्यांच्याकडे काहीच अधिकार नसलेले सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रीपद असले तरी ते सोडण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे आठवले यांनी भाजपशी नरमाईची भूमिका स्वीकारली आहे.

राज्यसभेचे सूतोवाच :

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या समोर आठवले यांनी ‘मोदी हे मला पुन्हा राज्यसभा देतील’ असे जाहीर करुन टाकले. दुसरीकडे रिपाइंचा प्रबळ गट असलेल्या वंचितने मुंबईत काँग्रेसबरोबर आघाडी केली असून ४५ जागा लढवत आहे. त्यामुळे आठवले यांचे कार्यकर्ते भाजपवर संतापलेले आहेत. आठवले स्वत:चा स्वार्थ बघतात पण कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात, अशीही भावना पक्षात तीव्र होऊ लागली आहे.

मुंबईत भाजपने एकही जागा दिलेली नाही. त्याबाबत कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र राज्यातील उर्वरित महानगरपालिकांमध्ये भाजपने ‘रिपाइं’ला सन्मानाने जागा दिल्या आहेत. राज्यसभा मिळवण्यासाठी पक्षाने तडजोड केली या आरोपात तथ्य नाही. – गौतम सोनवणे, राज्य सरचिटणीस, रिपाइं