मुंबई : राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची भाषा करीत नव्या राजकीय वादाला तोंड फोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवा, असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या चुकीच्या भूमिकेला पक्षाचे कार्यकर्ते कृतिशील विरोध करतील, असा प्रतिइशारा आठवले यांनी दिला आहे. पुण्यात शनिवारी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भूमिकेचा रिपल्बिकन पक्ष कृतिशील विरोध करील असे त्यांनी म्हटले आहे. जेथे मशिदींवरील भोंगे जबरदस्ती काढले जात असतील तेथे मुस्लिम बांधवांच्या पाठीशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उभे रहावे, जिथे हिंदू बांधवांवर अन्याय होईल, तिथे हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.