शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम विधीमंडळात निवृत्तीचं भाषण करताना भावूक झालेले पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणाची आठवण काढली. तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला उद्देशून बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही, असं आश्वासन दिलं. यावेळी त्याचा कंठ दाटून आला आणि ते गहिवरले.

रामदास कदम म्हणाले, “माझ्या मनात कुठलंही दुःख नाही. शिवसेना प्रमुखांचं सर्वात शेवटचं भाषण होतं, त्यात त्यांनी अरे बाबांनो माझ्यानंतर उद्धवला साथ द्या असे शब्द काढले. म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही.”

“मी कधीकधी भडकतो-चिडतो, पण दरेकरांनी…”

“कधीकधी कुटुंबात भांड्याला भांडी लागतात त्यात विपर्यास करण्याची गरज नाही. मतभेद होत असतात, पण ते तात्पुरते असतात. मी कधीकधी भडकतो, चिडतो, माझा स्वभाव तसाच आहे, पण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे मी तितकाच मायाळू सुद्धा आहे,” असंही रामदास कदम यांनी सांगितलं.

“या एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य”

रामदास कदम यांनी कोकणातील प्रश्नावर आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. ते म्हणाले, “एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य आहे. माझ्या कोकणासाठी जी सिंचनाची व्यवस्था आहे ती स्वातंत्र्यानंतर फक्त दीड टक्का आहे. अगदी मंत्री असताना मी अनेकदा हा विषय कॅबिनेटमध्ये लावून धरला. त्यात मला यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो आणि सगळ्यात जास्त अन्याय देखील कोकणावर होतो. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन टक्का ५५ टक्के आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्या कोकणात दीड टक्के सिंचन आहे याचं शल्य माझ्या मनात आहे.”

हेही वाचा : “अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर…” ; रामदास कदम यांचं मोठं विधान!

“भविष्यात या सभागृहाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कोकण वैधानिक महामंडळ बरखास्त झालेय. मी त्याच्या सर्व फाईल्स मुद्दाम सोबत आणल्यात. त्या मी तुमच्याकडे देईन. कोकणासाठी देखील महामंडळ व्हावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे,” असंही कदमांनी नमूद केलं.