मुंबई : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. मात्र म्हात्रे यांना फक्त अटक नको, तर त्यांच्यावर लावण्यात येणारी कलमे आणि होणारी कारवाई ही कठोर स्वरुपाची असून, त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी भूमिका डॉक्टर व परिचारिका संघटनांनी घेतली आहे. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर येथील रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्यावर कोणते कलम लावण्यात आले आहे, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन कायम राहणार आहे. म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर त्यांची काही दिवसांत सुटका होता कामा नये. त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी केली.
डाॅक्टरांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये मार्डच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन कायम करणार आहे. तसेच म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास राज्यातील सर्व डॉक्टर संघटना, वैद्यकीय संघटना व आरोग्य कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. रमेश म्हात्रे यांना अटक झाली असली तरी उद्या ते जामीनावर बाहेर पडतील. हे होता कामा नये. त्यानंतर पुढे काय करायचे याबाबत आम्ही रविवारी निर्णय घेऊ. मात्र रविवारी काळी फिती लावून करण्यात येणारे आंदोलन कायम राहणार आहे. म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करताना त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सचिव सुमित्रा तोटे यांनी सांगितले.
सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर गरीब व गरजू रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कायद्याचे पालन करण्याची शपथ घेतलेले लोकप्रतिनिधी हे जनसेवक असतात. त्यामुळे ते कायदा हातात घेऊ शकत नाहीत किंवा डॉक्टरांविरुद्ध हिंसाचार करू शकत नाहीत. त्यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कृती अत्यंत निंदनीय असल्याचे मत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत केरकर यांनी व्यक्त केले.
जीव वाचविण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारी हिंसा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. राज्य शासनाने आणि संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष व तातडीने चौकशी करून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे फाईमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी सांगितले.
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात आणि त्यांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकरणाची त्वरित आणि निष्पक्ष चौकशी केली जावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये अधिक कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या जाव्यात, अशी प्रतिक्रिया बीएमसी मार्डच्या अध्यक्ष डॉ. ऋतुजा राऊत यांनी व्यक्त केली.
