मुंबई : रामटेकच्या रामाचा भक्त असल्याचे विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र दिले तरच या राममंदिराच्या विश्वस्त व्यवस्थेचे सदस्यत्व होता येईल, अशी चमत्कारिक तरतूद महायुती सरकारने केली आहे. विरोधकांनी या तरतुदीला आक्षेप घेतला तरीही सरकारने बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर केले.
श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (रामटेक) हे विधेयक चर्चेसाठी आले असता विरोधकांनी त्यातील काही तरतुदींना आक्षेप घेतला. देवस्थान व्यवस्थापन समितीवर आठ सदस्यांची नेमणूक करण्याची तरतूद आहे. यामध्ये रामटेकचे आमदार व नगराध्यक्ष यांचाही समावेश असेल. हे विधेयक मांडणारे राज्यमंत्री आशिष जयस्वाल हेच रामटेकचे आमदार असल्याने त्यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला.
समिती सदस्याला तो रामटेकच्या श्री रामाचा भक्त असल्याचे विहित नमुन्यात प्रतित्रापत्र सादर करावे लागणार आहे. या तरतुदीला जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव. जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई या विरोधी सदस्यंनी तीव्र आक्षेप घेतला. एखादा अयोध्येचा राममंदिराचा भक्त असल्यास त्याची नेमणूक करता येणार नाही का, असा तिरकस सवाल विरोधकांनी केली. एखादी व्यक्ती जर हनुमानाला मानत असेल तर दुहेरी निष्ठेचा गंभीर प्रश्न तयार होईल.
सर्वधर्मसमभावाचे तत्व मानणाऱ्या राज्यघटनेतील तरतुदीच्या विरोधातील हे विधेयक आहे, असा आक्षेप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी घेतला. हनुमान भक्त, महादेव भक्त किंवा आयोध्येतील रामचे भक्त असून चालणार नाही, त्यांना रामटेकच्या रामाचेच भक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे हा कोणता न्याय, असा सवालही विरोधकांनी केला. अयोध्याच्या रामाला मानणारा रामटेकच्या मंदिराचा विश्वस्त होऊ शकणार नाही का, असा सवालही करण्यात आला.
मुळात विश्वस्त म्हणून राजकारणी लोकांना ट्रस्टवर घेऊ नका, इतका भ्रष्टाचार होईल की, अयोध्येचे मंदिर मागे पडेल, असा टोलाही विरोधकांकडून लगावण्यात आला.विरोधकांनी आक्षेप घेऊनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेयक मंजूर केले. रामटेकच्या राममंदिराचा भक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची तरतूद कायद्यात कायम ठेवण्यात आली.
अयोध्येतील चोरीवरून भाजपला चिमटे
या विधेयकाच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिरातील चोरीचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी सदस्यांनी भाजपला कोंडीत पकडले. चंपत राय यांच्यावर झालेले आरोप, सीसीटीव्हीवर धोतर टाकून करण्यात आलेली चोरी यावरून चिमटे काढण्यात आले. रामटेकच्या मंदिरात कर्मचाऱ्यांना धोतर नेसण्यास बंदी घाला म्हणजे चोरी होणार नाही, असा हल्लाही विरोधकांनी चढविला. अयोध्येतील राम मंदिरातील चोरीचा मुद्दा विरोधी सदस्यांनी सातत्याने उपस्थित करीत सत्ताधारी भाजपचा चांगलेच अडचणीत आणले. यामुळे भाजप सदस्यांना मौन बाळगून बसावे लागले.
