मुंबई : प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेले आठवडाभरापासून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाबाबत सत्र न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे. दरम्यान, सरकारवर टीका करणे हा राजद्रोह होत नाही, असा दावा राणा दाम्पत्याने जामिनाची मागणी करताना केला. देशात सद्य:स्थितीत हिंदुत्त्व हे एक मुख्य सूत्र बनले आहे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी या सूत्राचा राजकीय हितासाठी वापर केला जात असल्याचा आरोप पोलिसांतर्फे राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध करताना केला गेला.

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी मशिदीबाहेर हनुमान चालिसाचा जप करण्याचे आवाहन केल्याने धार्मिक तणाव वाढू शकला असता. परंतु आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचे म्हटले होते. त्याने कोणताही जातीय तणाव निर्माण झालेला नाही, असा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्या वतीने करण्यात आला.