मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत रोडावली असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. गेल्या तीन चार वर्षात नवीन प्राणी आणण्यात अपयश आल्यामुळे ही संख्या रोडावत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २५ लाख ४२ हजार पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती व पावणे दहा कोटींचा महसूल मिळाला. मात्र २०२३ मध्ये तब्बल २९ लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली होती.
भायखळा येथील मुंबई महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. दरदिवशी साधारण दहा ते पंधरा हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तर शनिवारी व रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ही संख्या २० हजाराच्याही पुढे जाते. वार्षिक सुमारे २५ लाखांच्याआसपास पर्यटक या ठिकाणी भेट देतात. यंदा २५ लाख ४२ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त असली तरी २०२२-२३ च्या तुलनेत कमी झालेली आहे.
भायखळ्याच्या प्राणीसंग्रहायलयात पेंग्विन येण्यापूर्वी दरवर्षी सुमारे १२ लाखापर्यंत पर्यटक भेट देत होते व सुमारे १ कोटीपर्यंत वार्षिक महसूल मिळत होता. मात्र पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढली. तसेच २०१७ मध्ये मुंबई महापालिकेने प्रवेश शुल्कही वाढवल्यामुळे वार्षिक उत्पन्न वाढले होते. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाला वार्षिक ५ ते सात कोटींचा महसूलही मिळू लागला होता. तर टाळेबंदीनंतर २०२२-२३ मध्ये प्राणी संग्रहालयात पर्यटकांची विक्रमी संख्या नोंदवली गेली व महसूलही ११ कोटींच्या पुढे गेला. मात्र ही संख्या त्यानंतरच्या आर्थिक वर्षात कमी झाल्याचे आढळून आले आहे. यंदाच्यावर्षीही तो आकडा गाठणे प्राणी संग्रहालयाला शक्य झालेले नाही.
प्राणी संग्रहालयात गेल्या काही कालवाधीपासून नवीन प्राणी आणता आलेले नाहीत. त्यामुळे देखील पर्यटक संख्या कमी झालेली असू शकते. सिंह आणण्यात आलेले अपयश, पेंग्विनचे संपलेले आकर्षण यामुळे कदाचित पर्यटकांची संख्या वाढत नसल्याचे समजते.
करोनानंतर पर्यटकांमध्ये वाढ …
दरम्यान, याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की टाळेबंदीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडू लागले व त्यामुळे विक्रमी संख्या नोंद झाली. त्याच्याशी तुलना केली तर गेल्यावर्षीची संख्या घटलेली दिसते. मात्र त्या वर्षाशी तुलना करता येणार नाही असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
प्राणी संग्रहायलयात अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणी संग्रहालयात सध्या २१ पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत. तर सिंह आणण्याचा प्रकल्प मात्र रखडलेला आहे.
२०१७ मध्ये प्रवेश शुल्क वाढवण्यात आले होते. सध्या लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौंटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे.
वार्षिक संख्या
| वर्ष | पर्यटक | महसूल |
| २०२२-२३ | २९ लाख ५६ हजार ५८९ | ११ कोटी ५९ लाख ४७ हजार |
| २०२३-२४ | २८ लाख ९७ हजार ६७९ | ११ कोटी ४६ लाख २९ हजार |
| २०२४-२५ | २३ लाख ५७हजार ८३१ | ९ कोटी १८ लाख ७५ हजार |
| २०२५-२६ | २५ लाख ४२ हजार १३५ | ९ कोटी ८५ लाख ८७ हजार |
