प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे

मुंबई :  टाळेबंदीमुळे जवळजवळ ११ महिन्यांपासून बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान (राणीची बाग) पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना जिजामाता उद्यानात प्रवेश द्यावा यासाठी संचालकांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर झाल्यास लवकरच सर्व नियमांसह राणीची बाग खुली होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर राणीची बाग ही बंद ठेवण्यात आली होती. टाळेबंदी आता सर्वच क्षेत्रात शिथिल झाल्यामुळे आता राणीची बागही खुली करावी यासाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठीचा आराखडा यात देण्यात आला आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

टाळेबंदीपूर्वीच्या काळात राणी बागेत नियमितपणे पाच ते सहा हजार पर्यटक येत असतात. मात्र आता पर्यटकांची संख्या नियंत्रित राहावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली.

गर्दी झाली की प्रवेशबंद

उद्यानात पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून जागोजागी ठराविक अंतरावर वर्तुळ आखण्यात आले आहे. प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत. तसेच जागोजागी सॅनिटायर, कचराकु ंडी आदींची सोय करण्यात आली आहे. मात्र गर्दी वाढली तर मात्र त्यावेळे पुरते प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सामान कक्षही बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे पर्यटकांनी सामान घेऊन येऊ नये. तसेच पक्ष्यांच्या पिंजऱ्यातील पर्यटकांसाठी असलेला छोटा पूलही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आत पिंजऱ्यात जाता येणार नाही, तर बाहेरूनच पक्षी पाहावे लागणार आहे.

पाच कोटींच्या महसुलावर पाणी

राणी बागेत दररोज सुमारे पाच-सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटक येत असतात. टाळेबंदीपूर्वी दर दिवशी १५ ते १६ हजार रुपये, तर शनिवार, रविवारी लाखांच्या घरात उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून राणीबाग बंद असल्याने आतापर्यंत पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.