scorecardresearch

राणीच्या बागेच्या तिजोरीत सर्वाधिक वार्षिक महसूल, पर्यटकांचाही उच्चांक

नऊ महिन्यातच २१ लाखांहून अधिक पर्यटक ८ कोटींहून अधिक महसूल जमा

राणीच्या बागेच्या तिजोरीत सर्वाधिक वार्षिक महसूल, पर्यटकांचाही उच्चांक

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : भायखळ्याच्या जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणी बाग) नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक महसूल यंदा जमा झाला आहे. तर पर्यटक भेटीचा वार्षिक उच्चांकही मोडीत निघाला आहे. दरवर्षी सरासरा १२ लाख पर्यटक राणीच्या बागेत येतात, तर चालू आर्थिक वर्षात नऊ महिन्यात २१ लाख पर्यंटकांनी भेट दिली आहे. तर वार्षिक महसुलातही यंदा दुपटीने वाढ झाली असून आतापर्यंत ८ कोटी ६० लाख रुपये महसूल जमा झाला आहे.

करोना व टाळेबंदीमुळे बराच काळ भायखळ्याचे प्राणी संग्रहालय बंद ठेवावे लागले होते. मात्र या काळात घसरलेले उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात भरून निघाले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाला दरदिवशी ६ ते ७ हजार पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचते. मात्र राणीच्या बागेत पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांची संख्या प्रतिदिन ४० हजारांवर गेली होती. महानगरपालिकेने २०१७ मध्ये प्रवेश शुल्क वाढवले. त्यानंतर पर्यटकांची संख्या रोडावली होती. पण उत्पन्न वाढले होते. यंदा मात्र पर्यटकांची संख्या आणि उत्पन्न दोन्हीही प्रचंड वाढले आहे.

हेही वाचा >>> Mumbai Fire Brigade Recruitment : राज्य सरकारचा पाठ्यक्रम पूर्ण करणारे अग्निशामक ‘एका’ अटीमुळे नोकरीस मुकणार

राणीच्या बागेत पेंग्विन आल्यानंतर प्राणी संग्रहायलयाचा महसूल आणि पर्यटकांची संख्या एकदम वाढली होती. पेंग्विन येण्यापूर्वी राणीच्या बागेचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांच्या आत होते. दरवर्षी १२ लाखापर्यंत पर्यटक भेट देत होते. मात्र पेंग्विनच्या आगमनानंतर ही संख्या २०१७-१८ मध्ये प्रथमच १७ लाखांवर गेली होती. हा उच्चांक यंदा मोडीत निघाला असून या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच ही संख्या २१ लाखांवर गेल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत ८ कोटी ६० लाख रुपये महसूल जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी मे महिना, दिवाळीच्या सुट्टीत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दरमहा महसूल एक कोटी रुपयांच्या पुढे गेला होता, असेही ते म्हणाले. तर जानेवारीच्या पहिल्याच रविवारी गर्दीचा उचांक झाला होता.

हेही वाचा >>> ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रकल्पाच्या महारेरा नोंदणीचा मार्ग मोकळा; विकासक आणि ग्राहकांना मोठा दिलासा

टाळेबंदीमध्ये महसूल बुडाला

२०२०-२१ मध्ये लागू झालेल्या पहिल्या टाळेबंदीत जवळजवळ वर्षभर प्राणीसंग्रहायलय बंद होते. टाळेबंदी उठविल्यानंतरही प्राण्यांना संसर्ग होऊ नये म्हणून प्राणी संग्रहालय संपूर्ण वर्षभर बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे महसूल बुडाला होता. पुन्हा दुसऱ्या लाटेत एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतही प्राणीसंग्रहालय बंद होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर प्राणी संग्रहायलय पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र तिसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी २०२२ मध्ये प्राणीसंग्रहालय महिनाभर बंद ठेवण्यात आले होते. कडक निर्बंध हटविल्यानंतर यंदा प्राणीसंग्रहालय सुरू आहे.

करोनापूर्वकाळात प्राणीसंग्रहालयात केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते. मात्र आता ‘शक्ती’, ‘करिश्मा’ ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणीसंग्रहालयात सध्या बारा पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.

२०१७ मध्ये प्रवेश शुल्क वाढवण्यात आले होते. सध्या लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौंटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे.

वर्ष …………………………………पर्यटक ………………………………..महसूल

एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ ………१२,४०,७८२ …………..६७,०३,४४९ रुपये

मार्च २०१५ ते मार्च २०१६ ………..१२,५१,१४९ …………..७०,०३,२५६ रुपये

मार्च २०१६ ते मार्च २०१७ ………..१३,८०,२७१ ………….७३,६५,४६४ रुपये

मार्च २०१७ ते मार्च २०१८ ………..१७,५७,०५९ ……….४,३६,६६,९९८ रुपये

मार्च २०१८ ते मार्च २०१९ ………..१२,७०,०२७ ………..५,४२,४६,३५३ रुपये

मार्च २०१९ ते मार्च २०२० ………..१०,६६,०३६ ………..४,५७,४६,१५० रुपये

मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ …….प्राणीसंग्रहालय पूर्ण बंद

नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ ……..७,२५,१०१ ……….३,००,५९,९९५ रुपये

एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ …….२२,९२,१६५ ………८,६०,२३,०८६ रुपये

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:50 IST

संबंधित बातम्या