केदार जाधवने शानदार शतक झळकावल्यानंतरही महाराष्ट्रासाठी रणजी करंडकाच्या जेतेपदाचे स्वप्न दूरच राहणार, ही आता काळ्या दगडावरची रेष आहे. पहिल्या डावात २१० धावांचे आधिक्य मिळविणाऱ्या कर्नाटकने विजेतेपदासाठी आपली बाजू वरचढ केली आहे. परंतु तरीही त्यांनी शनिवारी नकारात्मक गोलंदाजी करीत रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ३०५ धावांना कर्नाटकने ५१५ धावा करीत खणखणीत उत्तर दिले. जर महाराष्ट्राने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणातील चुका टाळल्या असत्या तर कर्नाटकला एवढी मजल गाठता आली नसती, हे प्रकर्षांने दिसून आले. त्यांना मिळालेली २१० धावांची आघाडी अंतिम दिवसासाठी किती निर्णायक ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्राने ही पिछाडी भरून काढताना दुसऱ्या डावात ६ बाद २७२ धावा केल्या व ६२ धावांची आघाडी घेतली आहे. काही चमत्कार घडला तरच महाराष्ट्राला आता विजेतेपदाची आशा धरता येणार आहे.
पहिल्या डावाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सकारात्मक खेळ केला. मात्र त्यांना या सामन्यात उशिराच सूर गवसला, हे अनेक वेळा प्रत्ययास येत होते. पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाल्यावरही मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला. केदार जाधव व अंकित बावणे या जोडीने शतकी भागीदारी करीत धावफलक हलता ठेवला. या सामन्यात महाराष्ट्राकडून झालेली ही पहिलीच शतकी भागीदारी होती. बावणेने चार चौकारांसह ६१ धावा केल्या. त्याने जाधवच्या साथीने १५९ मिनिटांमध्ये ११८ धावांची भागीदारी केली. जाधवने चिराग खुराणासोबत आश्वासक खेळ केला. त्याने या दरम्यान प्रथम श्रेणीतील आपले दहावे शतकही साजरे केले. त्याचे हे शतक अवघ्या ११८ चेंडूंमध्ये झाले. जाधवने २२९ मिनिटांच्या खेळात १० चौकारांसह ११२ धावा केल्या. शेवटच्या सत्रात कर्नाटकच्या गोलंदाजांनी फुलटॉस व यष्टीबाहेर चेंडू टाकून महाराष्ट्राच्या फलंदाजांना धावा करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण करतानाही त्यांनी वेळकाढूपणा करत नकारात्मक खेळाचे प्रदर्शन केले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ३०५,
कर्नाटक (पहिला डाव) : १७१.१ षटकांत ५१५ (रॉबिन उथप्पा ७२, लोकेश राहुल १३१, गणेश सतीश ११७; समद फल्लाह ३/९३, श्रीकांत मुंढे  २/९०)
महाराष्ट्र (दुसरा डाव) : ६८ षटकांत ६ बाद २७२  (अंकित बावणे ६१, केदार जाधव ११२; विनयकुमार ४/८४, श्रेयस गोपाळ २/३७).

आर. विनय कुमारकडून पत्रकारांना अपशब्द!
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या भारतीय खेळाडूंचा अहंपणा स्थानिक सामन्यांमध्ये सतत दिसून येतो. या सामन्यात फलंदाजी करताना आर. विनयकुमारने गोलंदाजीचे बूट घातले होते. त्याने हे कृत्य केल्यानंतर पंचांनी त्याला बूट बदलून खेळायची सूचना केली. आपले हे बूट फलंदाजीचेच बूट होते, असा दावा त्याने केला होता. याबद्दल त्याला पत्रकार परिषदेत विचारले असता उत्तर न देता तो पत्रकार परिषदेच्या कक्षाबाहेर आला व त्याने प्रसारमाध्यमांबाबत अपशब्द उच्चारले.

विनय कुमारचे तीनशे बळी
विनयकुमारने केदार जाधवला बाद करीत प्रथम श्रेणी सामन्यांमधील बळींचे त्रिशतक पूर्ण केले. त्याने ८६ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात आतापर्यंत चार बळी घेतले आहेत.