दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी २०१८ मध्ये ‘फर्जंद’ चित्रपट केला, तेव्हा इतिहासपटांची फारशी रेलचेल नव्हती. २०१९ मध्ये ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित झाला, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी मोहिमांच्या कथा चित्रपट रूपात पडद्यावर आल्या. आणि त्यांच्या गाजलेल्या जवळपास सगळ्याच मोहिमांच्या गोष्टी प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवअष्टक’ चित्रपट श्रृंखलेतील आगऱ्याहून सुटकेच्या मोहिमेचा थरारही त्याला अपवाद नाही. त्यामुळे लोकांसाठी अतिपरिचयाची असलेली ही गोष्ट चित्रपट रुपात आणताना कथनशैलीचं तंत्र बदलत त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केला आहे.

हा चित्रपट करत असताना मूळ कथेचा जीव फार मोठा नाही, याची जाणीव लेखक-दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांना होती हे चित्रपटाच्या पहिल्या दृश्यचौकटीपासून जाणवतं. त्यामुळे चित्रपट थेट आग्ऱ्याच्या मोहिमेवर येत नाही. चित्रपटाची सुरुवात औरंगजेबाचे छळकपट करून, आपल्याच ३६ नातेवाईकांचा बळी देत तख्तावर बसण्याच्या गोष्टीपासून होते. औरंगजेब आणि शिवाजी महाराज ही दोन सत्ताकेंद्रे… दख्खन आपल्या कवेत घेऊ पाहणाऱ्या औरंगजेबाचा मनसबा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकत नव्हता. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पूर्ण जाणीव असलेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांच्यावर दक्षिण मोहिमेची जबाबदारी टाकली. एका हिंदू राजाला दुसऱ्या हिंदू राजासमोर उभं करत आपापसांतच रक्तसंघर्ष उभा करण्याची औरंगजेबाची खेळी महाराजांच्या लक्षात आली होती. मात्र, मुघलांचे निष्ठावान सरदार म्हणूनच आयुष्य घालवलेल्या मिर्झा राजे जयसिंग यांनी या वास्तवाकडे काणाडोळा करत औरंगजेबाप्रती आपल्या निष्ठेचे पालन करण्यातच धन्यता मानली. मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमानंतरही दिलेर खानाच्या मदतीने वज्रगड घेतल्यानंतर मिर्झा राजेंनी पुरंदराकडे वळवलेल्या तोफा, ठिकठिकाणी औरंगजेबाने मराठी जनतेची सुरू केलेली होरपळ या परिस्थितीत धीराने पुरंदरचा तह करत औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आग्रा भेटीचं निमंत्रण स्वीकारणाऱ्या महाराजांची मानसिकता, त्यांची कूटनीती, आग्र्याविषयी काहीही माहिती नसताना तिथे जाऊन थेट औरंगजेबाचा बळी घेण्यासाठी नियोजन करणारे राजे, त्यांच्याबरोबरचे त्यांचे विश्वासू साथीदार, खुद्द जिजाऊ या सगळ्यांची घालमेल अशा बारीकसारीक गोष्टी आपल्यासमोर आणत लांजेकर यांनी ‘रणपति शिवराय’ची मांडणी केली आहे.

पूर्वार्धात हा चित्रपट हळूहळू एकेक घटनांची वीट रचत आग्रापर्यंत पोहोचतो आणि उत्तरार्धात खऱ्या अर्थाने वेग घेत आग्रा येथील महाराजांची कैद, तेथून सुटका हा कथाप्रकार विस्ताराने येतो. शिवाजी महाराजांची आग्रा येथील कैद आणि सुटका ही स्वराज्याच्या निर्मितीमधीलही महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्याच बाजूंनी आपण वेढलो गेलो आहोत, याची जाणीव झाल्यानंतर एक पाऊल मागे जाताना यानंतर मात्र अतुलनीय पराक्रम गाजवूनच गेलेल्या २३ किल्ल्यांसह स्वराज्य उभे करायचे आहे, याची जाणीव महाराज आपल्या साथीदारांना करून देतात, तो क्षण या घटनांचं खऱ्या अर्थाने महत्त्व अधोरेखित करतो. महाराजांच्या हुशारीची, संयमाची, जिद्दीची, धैर्याची, कूटनीती कौशल्याची जाणीव या गोष्टीच्या माध्यमातून करून देताना घटनाक्रमांची मांडणी या सरळसोट पद्धतीला दिग्दर्शकाने फाटा दिला आहे. त्याऐवजी बहिर्जी नाईकांच्या पात्राचा आधार घेत काही कथा त्यांच्या तोंडून उलगडतात, वर्तमानातल्या गोष्टीचा संदर्भ उलगडून सांगण्यासाठी मध्येच चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळात नेऊन पुन्हा आत्ता सुरू असलेल्या गोष्टीत जोडून घेतो. या हाताळणीमुळे चित्रपट एकसुरी वाटत नाही हे खरं असलं तरी या प्रकारामुळे महाराजांपेक्षा बहिर्जींची व्यक्तिरेखा अधिक काळ पडदा व्यापून असते याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. या संपूर्ण कथेत युद्धकथा ही फार नाही. मुरारबाजींची गोष्ट सोडली तर युद्ध मोठया प्रमाणावर नाही. त्यामुळे व्हीएफएक्सचं प्रमाणही मर्यादित असलं तरी काही प्रमाणात युद्ध वा छोटेखानी लढाईची दृश्ये अतिरंजित करण्याचीही फारशी गरज नव्हती. मुळात असा प्रकार दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटात फारसा केलेला नाही, त्यामुळे वास्तववादी मांडणीवर त्यांचा नेहमीचा भर असताना अशा पद्धतीची लोकानुनय असलेली मांडणी खटकते. चित्रपटाची लांबीही निश्चित कमी करता आली असती.

चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेचे शिवधनुष्य अभिजीत श्वेतचंद्र या तरुण कलाकाराने पेललं आहे. महाराजांचा करारीपणा, संयमाने केलेले नेतृत्व हे अभिजीतच्या व्यक्तिमत्त्वातून आणि देहबोलीतून उत्तम व्यक्त झालं आहे. दिग्पाल लांजेकर यांनी बहिर्जी नाईक यांची व्यक्तिरेखा खूप वेगळ्या पध्दतीने लिहिली आहे आणि साकारली आहे. जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, तानाजी मालूसरे म्हणून अजय पूरकर अशा विविध भूमिका लांजेकर यांच्या चमूतील यशस्वी कलाकारांनी उत्तम निभावल्या आहेत. औरंगजेबाच्या भूमिकेसाठी समीर धर्माधिकारी यांची निवड सार्थ ठरली आहे. आणि शिवराज अष्टकातील पुढच्या गोष्टीचा संदर्भही उत्साह वाढवणारा आहे. मूळ ऐतिहासिक घटनेतली सत्यता अबाधित ठेवत, बऱ्यापैकी दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेत दिग्पाल लांजेकर यांनी काहीएक वेगळ्या दृष्टिकोनातून ही ओळखीची गोष्ट रंजकतेने प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर

कलाकार – अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, ऋषी सक्सेना, दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर.