तुमच्या मुलीची अश्लील सीडी माझ्याकडे आहे. ती इंटरनेटवर अपलोड करेन अशी धमकी देत एका व्यापाऱ्याकडून १ कोटी ८४ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमास मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने ४ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अटक केली आहे.
गुजराथच्या वडोदा येथे राहणारी एक २४ वर्षीय तरूणी मुंबई हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करते. ऑक्टोबर २०१४ मध्ये तिच्या वडिलांना एक पत्र मिळाले होते. त्यात पैसे न दिल्यास मुलीची सीडी आणि छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड करेन अशी धमकी त्याने दिली होती. हे पैसे ओशिवरा येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीच्या सिमेंटच्या जाळीवर ठेवावेत असे सांगितले होते. मुलीच्या वडिलांना गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रविण पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांनी या तपास सुरू केला. ती व्यक्ती केवळ मुंबईच्या पीसीओवरून बोलायची. देशमुख यांनी त्याच्याशी मुलीचे नातेवाईक असल्याचे भासवून फोनवर संवाद सुरू केला आणि त्याचा विश्वास संपादन केला. एकदा पोलिसांनी त्या ठिकाणी केवळ ४ लाख टोकन म्हणून रुपये ठेवले. नंतर उर्वरित रक्कम घेण्यासाठी लोटस पेट्रोल पंपाजवळ बोलावले. तेथे सापळा लावल्यानंतर पैसे घेण्यासाठी आलेल्या नयन जाधव या इसमास ताब्यात घेतले. तो ओशिवरा येथे राहणारा आहे. एकदा या मुलीचे पाकीट रस्त्यात पडले होते. ते जाधवला सापडले होते. त्यातील पत्ता आणि माहितीच्या आधारे त्याने पैसे उकळण्याचा बनाव रचला होता.